भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण (MSEDCL)व त्यांच्या फ्रेंचाईजी क्षेत्रातील थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी गुरुवारी अभय योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ राज्यातील ३६ लाख ग्राहकांना होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वीज थकबाकीदार ग्राहकांसाठी वीज जोडणी संदर्भात अभय योजना (DF Amnesty Scheme) पुन्हा सुरू करण्याची ३४४३४ या क्रमांकाच्या लक्षवेधीद्वारे मी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत तसे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली.
आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, या योजनेचा लाभ घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक ग्राहकांना मिळणार आहे. महावितरणच्या फ्रेंचाईजी क्षेत्रातही आभय योजना लागू आहे. या योजनेमध्ये थकबाकीवरील संपूर्ण व्याज विलंब आकारासह माफ आहे. तसेच मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्के सवलत मिळेल. थकबाकी भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा आहे. १५ जानेवारी २०२७ पर्यंत योजना लागू आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ३४८ ग्राहकांकडे एकूण ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात २ हजार ९२ कोटी रुपये व्याज आणि विलंब आकाराचे आहेत. तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ६० हजार ग्राहकांकडे ४८८ कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यातील १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ होणार असल्याचे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
भिवंडी मध्ये आजही ५० हजार ग्राहकांच्या कायमस्वरूपी वीज जोडण्या खंडित असून त्यांच्याकडे २०० कोटी रुपये रुपयांची थकबाकी आहे. भिवंडी हे फ्रेंचाईजी क्षेत्र आहे. मागच्या वर्षीच्या अभय योजनेला भिवंडीत उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि १००० ग्राहकांनी त्याचा लाभ घेत ६ थकबाकी भरली होती, अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली.
शेवटी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत म्हणाले की, गेली दोन वर्षे राज्यात अभय योजना सुरू होती. मात्र यंदा तिची घोषणा झाली नव्हती. यासंदर्भात ३० जून रोजी मी विधानसभेत लक्षवेधी सादर केली होती. लक्षवेधीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केल्याबद्दल त्यांचे आभार. या योजनेमुळे भिवंडीतील वस्त्रोद्योग उद्योगाला मोठी चालना मिळणार असून राज्यभरातील सामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
