Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थव्यवस्थेबाबत गडकरी, मनसे, अर्थतज्ज्ञांकडून चिंता

महायुती सरकारने निवडणूकीच्या तोंडावर सुरु केलेल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर जाहिराती आणि प्रचारासाठी सरकारी तिजोरीतील तकरदात्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. तसेच तिजोरीकडे न पाहता पुन्हा सत्तेवर येण्यासाठी विविध घोषणा करत जनतेला पैसा वाटत आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचा आरोप करत राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मनसे आणि काही अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि विविध भाजप नेते, एनडीए सहयोगी आणि अर्थतज्ज्ञांनी उठवलेल्या चिंताजनक संकेतांवर प्रकाश टाकला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी राज्यावरील वाढत्या आर्थिक ताणाकडे लक्ष वेधले आणि संभाव्य संकटाचा इशारा दिला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सातत्याने, गडकरीजी, त्यांचे मनसेसारखे मित्रपक्ष आणि अर्थतज्ज्ञ अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली आहेत आणि काही महिन्यांत कदाचित ते पगार देऊ शकणार नाहीत,असल्याचेही यावेळी सांगितले.

सरकारच्या आर्थिक कारभारावर टीका करताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कोट्यवधी रुपये, करदात्यांच्या पैशाची जाहिरात आणि सरकारी कार्यक्रमांवर उधळपट्टी केली जात आहे. दसऱ्याच्या दिवशी स्वयंपाकाच्या तेलाचे भाव काय होते? कुटुंबांना दिवाळी फराळ कशी करता येईल? असा सवाल उपस्थित करत त्या म्हणाल्या की, राहणीमानाचा वाढता खर्च आणि त्याचा घरांवर होणारा परिणाम याबाबतही चिंता व्यक्त केली.

महाविकास आघाडी (एमव्हीए) मधील मतभेदाच्या अफवांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. महाविकास आघाडी एकत्रित आहे. या अफवा सतत उडत असतात. जयंत पाटील यांच्याशी काल बोलले. मी काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये अखिलेश यादव यांना भेटलो, आणि आम्ही आज सकाळी फोनवर बोललो, असल्याचे सांगत एमव्हीएचे वरिष्ठ नेते आज भेटतील आणि आघाडीच्या घटकपक्षांसोबत बैठकीनंतर महाविकास आघाडीची पहिली यादी लवकरच जाहिर होईल असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकारण ही एक गंभीर बाब आहे, ‘कोण कोणाच्या विरोधात काय बोलले’ एवढ्यापुरते मर्यादित ठेवू शकत नाही.’ महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण ही निवडणूक एकत्र लढणार आहोत,’ असे सांगून राजकारणाचे क्षुल्लकीकरण करू नये, असे आवाहनही यावेळी केले.

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याच्या महायुतीच्या निर्णयाबाबत विचारले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हम दूसरे के घर में झांकते ही नाही” (आम्ही इतरांच्या घरांत डोकावत नाही.) अशी उपहासात्मक टीका करत पुढे म्हणाल्या की,
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या तिकिटावर नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजी नगरमधून निवडणूक लढवणार असल्याच्या मी डिसेंबरमध्ये तुमच्या चॅनलवर देवेंद्र फडणवीस यांचे पत्र पाहिले होते. तुम्ही त्यांना स्पष्टीकरण विचारले पाहिजे असे सांगत त्यार भाष्य करण्याचे टाळले.

VBA प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी NCP (SP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या अलीकडील आरोपांना प्रत्युत्तर देताना, सुप्रिया सुळे यांनी जुने वाद पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत ते आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही लोकशाही आहे; प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा तुम्ही शरद पवारांना टार्गेट करता तेव्हा तुम्हाला हेडलाईन मिळते. १९८९ मध्ये त्या १५ वर्षांच्या होत्या आणि तेव्हापासून ३५ वर्षे झाली. ३५ वर्षे जुनी घटना समोर आणणाऱ्यांनी इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांना त्यांनी काय केले याचा जाब विचारला पाहिजे होता अशा उपरोधिक टोला प्रकाश आंबेडकर यांना लगावत शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर काय झाले ते देशाने पाहिले आहे असे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Exit mobile version