मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उबाठाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२५ सप्टेंबर) धाराशिवच्या दौऱ्यावर गेलो होते. धाराशिवमधील गावांना भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडले. तसेच आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतीपिकाचे किती नुकसान झाले, याची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, या पाहणीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सरकारला मदत करायला सांगू, असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी करा अशी मागणी करत राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसा नसेल तर पीएम केअर फंडातून पैसे राज्य सरकारकडून आणावे शेवटी पीएम केअर फंड कशासाठी स्थापन केला आहे असा सवालही यावेळी केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसात फक्त शेतीच नव्हे तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. दरवेळेला योग्य वेळेला मदत करू असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र आता योग्य वेळ कधी येणार. ही योग्य वेळ येण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? असा रोखठोक सवाल सरकारला केला. तसेच आम्ही एक प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणीही केली.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे ही आमची पहिली मागणी आहे. मी मध्येमध्ये शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याकडून निवेदने घेतली आहेत. सरकारने काय मदत केली हा वेगळा भाग आहे. पण शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये मिळाले पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या, अशी दुसरी मागणीही केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या पुरात शेतीचं फक्त नुकसानच झालेलं नाही. जमीनच खरडून गेली आहे. ही जमीन पुन्हा नीट करायला तीन ते पाच हजार वर्षे लागणार आहेत. आज सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च फार आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे असल्याच्या मुद्यावरही यावेळी भर दिला.
पिक विम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने पीकविम्याचे निकष बदलले आहेत. पीकमिव्याची पूर्ण रक्कम आताच मिळाली पाहिजे. पीकविम्याची रक्कम आताच मिळत नसेल तर विम्याचे थोतांड कशाला हवे, असे म्हणत पीकविम्याची रक्कम सरकारने तत्काळ द्यावी, अशीही मागणी करत आज माझ्या हतात काहीही नाही. मी फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. बार्शीमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर २० लाखांचं कर्ज आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की वेडंवाकडं पाऊल उचलू नका. वाईट दिवस जातील, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून नये असे आवाहन केले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वाईट दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. मदत देताना वेडेवाकडे निकष लावले जात असतील आणि सरकारी अधिकारी आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना आपल्याला सरळ करावे लागेल, असा सूचक इशारा देत पंचनामे करताना निकषांना बाजूला ठेवून मदत करावी. बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिशी आल्या आहेत. या सर्व नोटिशी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवू. हे कर्ज सरकारने भरावे असे आपण त्यांना सांगू, असे सांगत शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने फेडावे अशी मागणीही यावेळी केली.
