Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या निशिकांत दुबेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

हिंदी सक्तीचे दोन शासन आदेश रद्दे केले असले तरी हा वाद अजून संपलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते जाणीवपूर्वक मराठी भाषा व मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान करत आहे. महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्राबाहेर आपटून मारू या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांना हा अधिकार कोणी दिला असा संतप्त सवाल करत याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानाचा निषेध करत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, निशिकांत दुबे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात आता ते मराठी व महाराष्ट्रावर घसरले आहेत. तुमच्याकडे काय आहे, तुम्ही कोणाची भाकर खाता, अशी मुक्ताफळे दुबेंनी उधळती आहेत. मुंबई व महाराष्ट्रात उत्तर भारतातील लोक आपल्या रोजीरोटीसाठी येतात व त्यातील अनेक येथेच वास्तव्य करून आहेत. मुंबई व महाराष्ट्राने सर्वांनाच सामावून घेतले आहे. उत्तर भारतीयांसह अनेक प्रांतातील लोकांचा आधार मुंबई व महाराष्ट्र आहे. देशाच्या कर संकलनात ४० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे हे दुबेंना माहित नसावे. त्यामुळे कोण कोणाला पोसतो हे दुबेंनी डोळे उघडून पहावे अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचे वक्तव्य चिथावणीखोर आहेच, पण ते महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे. दुबे सारख्या नाठाळांचा बंदोबस्त भाजपाने करावा तसेच त्यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version