Marathi e-Batmya

उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांची ग्वाही, राज्यघटनेचे संरक्षण करणार

उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला.

उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी यांनी आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस खासदारांशी चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बी सुदर्शन रेड्डी पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन असे सांगत या निवडणुकीत व्हीप नसतो, गुप्त मतदान असते, त्यामुळे माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करावे, अशी विनंतीही सर्वपक्षीय खासदारांना केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आज देश संकटात असताना लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही लोकशाहीचा जागर आहे. संविधान रक्षणाचा संकल्प घेऊन बी. सुदर्शन रेड्डी सर्व राजकीय पक्षांना भेटून संवाद साधत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचीही त्यांनी भेट घेतली असून त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहचा निकाल चमत्कारिक असू शकतात, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमित बी. सुदर्शन रेड्डी यांचे स्वागत आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अत्यंत महत्वाची असून या निवडणुकीत काहीही होऊ शकते. इंडिया आघाडीकडे बहुमत नसले तरी निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कोल्हापूरचे खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज, खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ.शोभा बच्छाव, राज्यसभा सदस्य डॅा. नासिर हुसेन, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदी उपस्थित होते.

Exit mobile version