लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा संबंध संसदेने केलेल्या कायद्यांच्या वैधतेशी जोडला.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मतांच्या चोरीतूनच कायद्यांची चोरी होते. आज मत गेले आहे आणि कायदा बनवण्याची व्यवस्थाही गेली आहे. जर मतच चोरले गेले असेल, तर मतांच्या चोरीद्वारे संसदेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेले कोणतेही कायदे किंवा संस्थात्मक बदल हे देखील बेकायदेशीर ठरतात, असेही सांगितले.
राहुल गांधी यांनी या कथित गोंधळासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जबाबदार धरले आणि दावा केला की, दोन निवडणूक आयुक्तांनी (ECs) यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) दोष दिला होता.
एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, गेल्या १० महिन्यांत देशभरात ‘एसआयआर’ (SIR) लागू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक मुद्द्यांवर दोन निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मताशी सहमत नव्हते आणि त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते; या वृत्ताच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची ही टिप्पणी आली.
निवडणूक आयोगांतर्गत असलेल्या मतभेदांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, मत हा आपल्या राष्ट्राचा पाया आहे आणि आपले मतच नष्ट केले गेले आहे. हा केवळ मतांवर झालेला हल्ला नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या अभिव्यक्तीवर झालेला हल्ला असल्याचा आरोपही यावेळी केला.
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी या कथित “मत चोरी”ला देशाविरुद्धचे एक मोठे “कारस्थान” म्हटले. यावेळी राहुल गांधी यांनी मागे वळून एका स्लाईडकडे बोट दाखवले, ज्यामध्ये कथित कारस्थानकर्त्यांचे फोटो होते; यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा समावेश होता. त्यांच्या खाली “प्यादे” (pawns) दाखवले होते, ज्यांच्या फोटोंमध्ये काही प्रमुख पत्रकार आणि चित्रपट निर्मात्यांचा समावेश होता.
ज्ञानेश कुमार यांना “देशद्रोही” म्हणत राहुल क्षणभर थांबले आणि म्हणाले, “कारण हे सत्य आहे. जो व्यक्ती मतावर हल्ला करतो, जो भारताची लोकशाही संस्था मुळापासून नष्ट करतो, तो देशद्रोहीच असतो. त्याला दुसरा कोणताही शब्द वापरता येणार नाही. तोच योग्य शब्द असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले की, ते हे आरोप हलक्याफुलक्या पद्धतीने करत नाहीत. राहुल गांधी पुढे म्हणाले की, ते गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा मांडत आहेत आणि हे आरोप केवळ तर्क किंवा कल्पनेवर आधारित नसून तथ्यांवर आधारित आहेत. मी नेहमीच तथ्यांवर आधारित बोललो आहे. मी कोणताही तर्कवितर्क किंवा कल्पनेचा आधार घेतलेला नाही; मी केवळ तथ्यांचा वापर केला असल्याचेही सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला करून ती नष्ट केली आहे, असा आरोप करत मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, जर मतदानाची प्रक्रियाच नष्ट झाली, तर संविधान प्रभावीपणे काम करत नाही.
भारतातील निवडणुकांमध्ये “फेरफार” (rigging) केले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये फेरफार झाल्याची “१०० टक्के खात्री” असल्याचे सांगत “भारतातील निवडणुका – मग त्या लोकसभा असोत, २०२४ ची निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणुका – या सर्वांमध्ये फेरफार केले जात आहेत, याबद्दल ९९ टक्के नव्हे तर १०० टक्के खात्री बाळगण्याइतपत पुरेशी माहिती उपलब्ध आहे,” असेही सांगितले.
सत्ताधारी पक्षाविरुद्धची नाराजी (अँटी-इन्कम्बन्सी) – ज्याचा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांना वारंवार फटका बसला आहे – ती अलीकडील निवडणुकांमध्ये का नाहीशी झाल्यासारखी वाटते, असा प्रश्न गांधींनी उपस्थित केला.
राहुल गांधी पुढए म्हणाले की,१९७१ च्या बांग्लादेश युद्धानंतरच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकप्रियता आणि त्यानंतर काही वर्षांतच त्यांच्याविरुद्ध वाढलेली तीव्र नाराजी, याचे उदाहरण दिले. एकामागून एक अनेक नेत्यांच्या बाबतीत अगदी हेच घडते. काँग्रेस नेत्यांच्या बाबतीत हे घडते. प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत हे घडते. पण काही कारणास्तव, नरेंद्र मोदींच्या बाबतीत हे कधीच घडत नाही. शाहंच्या बाबतीत घडत नाही? भाजपच्या बाबतीत घडत नाही? असा सवालही केला.
हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील मतदानाच्या काळामध्ये (electoral swings) झालेला बदल त्यांनी निदर्शनास आणून दिला आणि सत्ताविरोधी लाटेचा पारंपरिक आकृतीबंध बदलला असल्याचा युक्तिवाद केला.
हे का घडत आहे हे समजून घेण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आणि याचे उत्तर निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींशी जोडले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, मतदान हा आपल्या देशाचा पाया आहे, निवडणूक आयोग हा मतदानाचा संस्थात्मक संरक्षक आहे. मतदानामुळेच संविधानाला ताकद मिळते, संविधानामुळे कायदे बनवणे शक्य होते आणि कायद्यांतून विविध संस्थांची निर्मिती होते, असे सांगितले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, जर मतदानच नष्ट झाले असेल, तर आपले संविधानही नष्ट झाले आहे. त्याला आता ती ताकद उरलेली नाही. ते आता कार्यक्षम राहिलेले नाही. मतदानाचे रक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीत निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचा आरोप केला आणि आपण हे आरोप ‘हवेत’ (कोणत्याही आधाराशिवाय) करत नसल्याचेही सांगितले.
राहुल गांधी यांनी मी ते पुराव्यासह दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी यापुर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांची पुर्नरावृत्ती केली.
राहुल गांधी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचाही उल्लेख केला आणि ज्ञानेश कुमार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेल्याचे सांगत, यापूर्वी त्यांच्या (संबंधित) आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असा दावा केला.
