Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा सवाल, महाराष्ट्रात मतदारांपेक्षा मतदान जास्त कसे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या विजयासंदर्भात संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा पक्षाचे नेते राहुल गांधी, शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणूकीच्या प्रक्रियेबाबत निकालावर संशय व्यक्त करत मतदारांपेक्षा मतदान कसे जास्त असा सवाल करत त्याची माहिती द्यावी अशी मागणी केली.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हणाले की, राज्याची लोकसंख्या ९.४ कोटी असताना ९.७ कोटी लोकांनी मतदान कसे केले असा सवाल केला. तसेच महाराष्ट्रात ३९ लाख मतदार कसे वाढले आणि कोठे वाढले याची माहिती द्यावी अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगावर कोणतेही आरोप करत नाही आहोत. आम्हाला फक्त अंतिम मतदार यादी हवी आहे. पारदर्शकता सुनिश्चित करणे ही तुमची जबाबदारी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मतदान करण्यास पात्र लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. तथापि, विधानसभा निवडणुकीत ९.७ कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. ते कसे शक्य आहे? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, २०१९ मधील विधानसभा निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान ३२ लाख मतदार जोडले गेले. दरम्यान, २०२४ मधील लोकसभा निवडणुकी आणि त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार जोडले गेले. हे फक्त पाच महिन्यांत झाले. लोकसभेत अध्यक्ष ओंम बिर्ला यांच्या उपस्थितीत मी संसदेत याबद्दल बोललो, परंतु निवडणूक आयोगाने अद्याप प्रतिसाद दिलेला नसल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी मागितलेल्या सर्व तथ्ये लेखी स्वरूपात प्रदान करेल. “ केंद्रीय निवडणूक आयोगाने ECI राजकीय पक्षांना प्राधान्य भागधारक मानते, अर्थातच मतदार हे प्रमुख असतात आणि राजकीय पक्षांकडून येणारे विचार, सूचना, प्रश्न यांना मनापासून महत्त्व देते. आयोग देशभरात एकसमानपणे स्वीकारल्या जाणाऱ्या संपूर्ण तथ्यात्मक आणि प्रक्रियात्मक मॅट्रिक्ससह लेखी स्वरूपात उत्तर देईल, असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स X वर एका पोस्टद्वारे म्हटले आहे.

अलीकडेच, राहुल गांधी यांनी निवडणुकीसंदर्भात संसदेत दोन आरोप केले होते – पहिले म्हणजे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान पाच महिन्यांत महाराष्ट्राच्या मतदार यादीत ७० लाख मतदारांची भर पडली आणि दुसरे म्हणजे, शिर्डीमधील एका इमारतीच्या पत्त्यावरून ७,००० नवीन मतदारांची नोंदणी झाली.

यावेळी शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत आणि त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणूकीत गुजरातमध्ये, झारखंड मध्ये आणि महाराष्ट्रात ज्या निवडणूका झाल्या. त्या निवडणूकांमध्ये ३९ लाख मतदार वाढले आहेत. हे मतदार आता दिल्लीत पोहोचले असून या मतदारांचा धुमाकुळ मागील दोन दिवसांपासून दिल्लीत पहात आहोत. आता हा फिरता मतदार लवकरच बिहार मध्ये पोहोचेल असेही यावेळी सांगितले.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात आमची एकच मागणी असून ती मागणी म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील मतदान प्रक्रिया पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी तेथील निवडूण आलेल्या मतदारांकडून आणि आमदाराची मागणी आहे. पण प्रशासन त्या गोष्टीला विरोध करत आहे. त्यामुळे निवडणूका ईव्हीएम मशिन्सवर घेण्याऐवजी मतदान पत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणीही यावेळी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी, २९ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि एका शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीपासून राज्यात मतदारांमध्ये १३% वाढ झाल्याचे म्हटले. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेल्या निवेदनात यादीत समाविष्ट केलेल्या ३९ लाख मतदारांचा “कच्चा डेटा” मागितला होता.

उत्तरात, निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर रोजी लिहिले की, लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात ४८,८१,६२० मतदारांची भर पडली आहे आणि ८,००,३९१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे ४०,८१,२२९ मतदारांची भर पडली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायद्यातील दुरुस्तीनंतर, १८ वर्षांचे होणाऱ्या नवीन मतदारांसाठी आता चार पात्रता तारखा आहेत: १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, या यादीत १८-१९ वयोगटातील ८,७२,०९४ मतदार आणि २०-२९ वयोगटातील १७,७४,५१४ मतदारांचा समावेश आहे.

“अशाप्रकारे, या कालावधीत एकूण ४०,८१,२२९ मतदारांपैकी १८-२९ वयोगटातील २६,४६,६०८ तरुण मतदारांची भर पडली. आपल्या लोकशाहीचे भविष्य असलेल्या तरुणांच्या सहभागाचा हा स्वागतार्ह ट्रेंड आहे. अशाप्रकारे, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात या कालावधीत झालेल्या वाढीमध्ये कोणताही असामान्य ट्रेंड दिसून येत नाही,” असे निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते.

Exit mobile version