Marathi e-Batmya

राहुल गांधी यांची घोषणा, ज्ञानेश कुमार, मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार

‘इंडिया’ (INDIA) आघाडी देशात “लोकशाही संपू देणार नाही”. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर “कारवाई केली जाईल” अशी घोषणा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर आयोजित सभेत बोलताना केली.

रामलीला मैदानावर एका जनसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना हटवणे हे “देशाला योग्य मार्गावर आणण्याचे पहिले पाऊल” असेल. मोदी कुठेही जाणार नाहीत, या अमित शाह यांच्या विधानाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, त्यांना कुठेही पळून जाऊ दिले जाणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आमचा नंबर तुमच्यासाठी (अमित शाह) असेल. कायदेशीर कारवाई केली जाईल. तुम्ही कुठेही पळून जाऊ शकत नाही असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, येथे जमलेली गर्दी मोदी आणि शाह यांना एक संदेश देण्यासाठी आली आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाचा आवाज नाही. हा भारतातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर १३.५ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. याचा अर्थ असा की, दर सातपैकी एका मतदाराला, म्हणजेच १५% मतदारांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. २०२४ मध्ये एनडीए (NDA) आणि विरोधी पक्षांमधील मतांचे अंतर ३% होते. त्यांनी या निवडणुकीला “बेकायदेशीर निवडणूक” आणि “चोरलेली निवडणूक” असे संबोधले. हे मी म्हणत नाहीये, तर भारतीय निवडणूक आयोगाची आकडेवारीच हे सांगत आहे, कारण निवडणूक आयोगानेच या मतदारांची नावे यादीतून काढून टाकली आहेत.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, ही काही साधी चोरी नाही—जशी दुकानातून एखादी वस्तू चोरली जाते. ही तर प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाची चोरी आहे. हा प्रकार “अत्यंत दुर्मिळ” (rarest of rare) घटना असून “देशद्रोह” आहे. ज्ञानेश कुमार “तुरुंगात जातील” असे सांगत ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते आणि अमित शाह गृहमंत्री बनू शकले नसते असेही यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बद्दल बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी सर्व संस्थांवर ताबा मिळवला आहे, तर या संस्था जनतेच्या आहेत, आरएसएस किंवा भाजपच्या नाहीत. त्यांनी सरकारवर काही निवडक उद्योगपतींना झुकते माप दिले आरोप करत “सर्व पैसा काही मोजक्या लोकांच्या — अदानी, अंबानींसारख्यांच्या — खिशात गेला आहे. त्यांची कर्जे माफ केली जातात. पण जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला पैशांची गरज असेल आणि तो कर्ज फेडू शकला नाही, तर त्याला तुरुंगात पाठवले जाते, आम्हाला असा देश नको आहे जिथे सर्व काही अदानींच्या मालकीचे असेल असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

‘शिव की बारात’चा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना असा भारत हवा आहे जो सर्वांसाठी खुला असेल. जर एखादा शेतकरी कठोर परिश्रम करत असेल, तर त्याला आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. जर एखादा विद्यार्थी १८ तास अभ्यास करत असेल, तर त्याला त्याचे फळ मिळाले पाहिजे, असेही सांगितले.


शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा मोदी, शाह किंवा कुमार यांच्याबद्दल कोणताही द्वेष नाही. आम्ही आरएसएस (RSS) किंवा भाजपच्या लोकांवर हल्ला करणार नाही. आम्ही त्यांना मारणार नाही, असे सांगत त्यांच्यासाठी धर्मापेक्षा लोकांचा आवाज अधिक महत्त्वाचा आहे: जर तुम्ही मला माझा धर्म विचारला, तर मी सांगेन की तो ‘लोकांचा आवाज’ हाच माझा धर्म आहे. भाजप आणि आरएसएसने द्वेष पसरवला आहे, ज्यामुळे देशाचे नुकसान झाले असल्याचा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version