Marathi e-Batmya

कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपासावर देखरेख ठेवायची की नाही ?

कॉ गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत दोन फरारी आरोपीबाबतचा तपास वगळता सर्व पैलूंनी तपास करण्यात आला आहे आणि त्यात नवे काही आढळून आले नसल्याच्या दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी उच्च न्यायालयात पुन्हा केला. तसेच, खटल्यात आतापर्यंत २८ साक्षीदार तपासण्यात आल्याचेही सांगितले. त्याची दखल घेतल्यानंतर प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

कॉ गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आधी विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) तपास करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. मात्र, आता हत्येच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली असून दोन वर्षांपासून हाच दावा केला जात आहे. परंतु, तपास यंत्रणेने सर्व पैलूंनी तपास केला आहे. दोन फरारी आरोपी वगळता आता तपास करण्यासारखे उरले नसल्याचे कारण पुढे करत उच्च न्यायालयाच्या न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले.

दुसरीकडे, प्रकरणाचा तपास सुरूच असून तो थांबवण्यात आलेला नाही. मात्र, दोन फरारी आरोपी वगळता तपास करण्यासारखे काहीच राहिलेले नाही. दोन्ही फरारी आरोपींचा छडा लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. खटलाही जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. हत्येच्या प्रत्यक्षदर्शी आणि पानसरे यांच्या पत्नीची साक्ष त्यांच्या आजारपणामुळे अद्याप नोंदवलेली नाही. परंतु, तीही नोंदवली जाईल, असे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

विशेष न्यायालयात खटला सुरू असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा दावा अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडे आणि शरद कळसकर या दोन आरोपींनी केला आहे. तर, पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार सारखेच असून त्यांचा शोध तपास यंत्रणांना लागलेला नाही अथवा त्या पैलूने तपास यंत्रणांनी प्रकरणाचा कधी तपासच केला नाही. त्यामुळे, तपास सुरू ठेवून त्यावर देखरेख ठेवण्याचा आग्रह पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वरिष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी युक्तिवाद करताना केला.

Exit mobile version