Marathi e-Batmya

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधात लढलो. मात्र तरीही आम्ही सर्वजण इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहोत असे सांगितले.

पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाच्या विरोधात आम्ही लढाई पुकारली आहे. महाराष्ट्रातही तशाच पध्दतीचे राजकारण भाजपाने सुरु केले आहे. त्यामुळे या लढाईत साथ देण्यासाठी मी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले असून त्यानंतर शरद पवार यांच्या भेटीसाठी जात असल्याचेही यावेळी जाहिर केले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला की, तुम्ही इंडिया आघाडीत आहात असे म्हणता मात्र तुमच्या राज्यात काँग्रेसला तुम्ही जागाही दिल्या नाहीत. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही तेथील जागा वाटपात इतर राष्ट्रीय पक्षांना स्थान देऊ शकत नाही. त्याचबरोबर आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्या डाव्या पक्षांनाही जागा वाटपात स्थान देऊ शकत नसल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबध आहेत. त्यामुळेच त्या मुंबईत आल्या आहेत. उगीच या भेटीत राजकारण आणू नका असे प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे ही आमची भेट कौटुंबिकच राहु द्या असे आवाहनही यावेळी केले.

Exit mobile version