विधान परिषदेतील शिवसेना उबाठाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आमदाराकीचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत पदा सध्या रिक्त आहे. तर शिवसेना उबाठाच्या संख्याबळानंतर काँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने एकमेकांशी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली.
या चर्चेत विधानसभेत शिवसेना उबाठाच्या आमदारांची संख्या सर्वाधिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उबाठाकडून कोकणातील ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस शिवसेना उबाठासह महाविकास आघाडीतील इतर दोन्ही पक्षांनीही केली आहे. परंतु अद्याप विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विधानसभेतील भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्ष नेते पदाबाबत टांगती तलवार आहे.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार अमीन पटेल ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/HQoTkwJb33
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 8, 2025
तर विधान परिषदेत शिवसेना उबाठा पक्षाच्या सदस्यसंख्येनंतर काँग्रेसची सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. त्यातर विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे निवृत्त झाल्याने काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक संख्या कमी शिवसेना उबाठाची झाली आहे. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेसची सदस्य संख्या सर्वाधिक ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेत्यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली.
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार म्हणाले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्षनेते पदासह इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील आमदाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अहवाल आम्ही दिल्लीतील हायकमांडला पाठविण्यात येईल. आता त्यावर दिल्लीतील हायकंमांड निर्णय घेतील आणि त्यानंतर इथे त्यासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मनसे-शिवसेना महाविकास आघाडीत सहभाग होऊन लढणार का असा सवाल केला असता त्या संदर्भात आमच्यात चर्चा झाली नाही. परंतु यासंदर्भात आम्ही शरद पवार यांना भेटून चर्चा करणार आहोत. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून निर्णय घेतील असे सांगितले.
