Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भोंदूबाबाची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे होती; तर सहा महिने झोपा काढल्या काय?

दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गडाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे, यातून आपण धडा घेतला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात, जाती जातीत वाद कोण निर्माण करत आहे. द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरात सारख्या विकृती जन्माला येतात याची दखल घेतली पाहिजे. २०१४ पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याच काळात अशोक खरात सारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आताही जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मित्रपक्षांना जेरीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे निषेधार्ह आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे, पण इतर सर्व संबंधितांचे काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच खरात सारखे विकृत निर्माण होतात, खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे काम पुढे घेऊन गेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरात सारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

राज्यात मंत्रीच मार खातात..!

सातारा प्रकरणी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली असून मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनीच मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हे लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे तसेच साताऱ्यात जे झाले त्यातून वोट चोरीवर शिक्कामोर्तब झाले असा आरोपही यावेळी केला.

अशोक खराताप्रमाणे भ्रष्टाचाराचीही विकृती..

आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड ज्या विकासाच्या वल्गना करत आहेत, त्यांनी कोणत्या गावात किती पैसे खर्च केले याची श्वेतपत्रिका काढावी. सर्व कंत्राटे तर त्यांच्या घरात व नातेवाईकांकडेच आहेत. रेतीची अवैध कामे कोण करत आहे, मटक्याची दुकानेही त्यांचीच आहेत. ३५ कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फार्च्यूनर कार आली, असे ते सांगत आहेत, तर ते ज्यातून फिरतात ती कोट्यवधींची डिफेंडर कार कोठून आली हेही त्यांनी सांगावे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत किती पटीने त्यांची संपत्ती कशी व किती वाढली हेही त्यांनी जाहीर करावे. निराधार लोकांना घरे बांधून देण्यासाठी २० एकर जमीन दान केली होती, त्याचे काय झाले हेही सांगावे. महाराष्ट्रात अशोक खरातची विकृती समोर आली तशीच भ्रष्टाचाराचीही विकृती समोर येत आहे हे चिंताजनक आहे असल्याचे सांगितले.

Exit mobile version