Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय?

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे व वसुली करणे एवढ्याच कामासाठी उरलेले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याला देवेंद्र फडणवीस यांचा दळभद्री कारभार जबाबदार आहे. राज्यात मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, असा संतप्त प्रश्न विचारून महाराष्ट्राचा तालिबान करणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी खुर्ची सोडावी, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

भाजपा महायुती सरकारचे वाभाडे काढताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारमधील मंत्री अतुल सावे यांचे भाऊ व पुतण्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जबर हल्ला करण्यात आला. याआधी जळगावात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली, त्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागली. आका, खोके, कोयत्या गॅग, गुंड, मवाली, गँगस्टर यांना राजकीय आशिर्वाद मिळत असून ते खुलेआम फिरत आहेत. ड्रग्जचा गोरख धंदा राजरोस सुरु असून ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ असे म्हणून महाराष्ट्राची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका होणार नाही, त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असावी लागते, ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस काय काम करतात याचे ताजे उदाहरण पुणे पोलीस आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कृत्याची गंभीर दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहपोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्यासह इतर पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांची कारच्या बॉनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी मानवी हक्क आयोगाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. पुणे पोलिसांवरील कारवाईसाठीची शिफारस ही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पावती असून त्यांनी महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासला आहे. पुण्याची अवस्था आता क्राईम कॅपिटल अशी बनली आहे, असेही म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून पोलीसांची भूमिका ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अशी राहिली नसून त्याच्या उलट बनलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विजय शेळके आणि महेश जाधव यांना गोरक्षणाच्या नावाखाली अमानुष वागणूक देण्यात आली. रस्त्यात गाठून विवस्त्र करून मारहाण केली व  बळजबरीने लघवी पाजली. हा विकृतीचा प्रकार महाराष्ट्रात होतो याची सरकारला लाज वाटली पाहिजे. मागील महिन्यात जालना जिल्ह्यातही अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. गुन्हेगारांना कशाचीही भिती राहिलेली नाही. देवेंद्र फडणविसांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नाव धुळीस मिळाले आहे, असा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version