Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही

सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या पैशाच्या हिशोब जनता विचारणारच, त्याचा एवढा राग येण्याचे काही कारण नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बघून घेण्याची जी भाषा केली ती अत्यंत निषेधार्ह व आक्षेपार्ह आहे. ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी ‘कुत्रे’, ‘भाड्याचे तट्टू’ असे शब्द शोभा देत नाहीत. ही ‘टपोरी’ लोकांची भाषा आहे. सरकारच्या कामावर बोलणे हे लोकशाहीत चुकीचे नाही. देवेंद्र फडणवीस यांना संताप येण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या भ्रष्ट कामाची पोलखोल केली व ‘इंन्फ्रा मॅन’ म्हणून ते टेंभा मिरवतात त्यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटले हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. मी केलं, मी केलं, अशी स्वताची पाठ थोपटून घेणाऱ्या फडणवीसांना ते रुचले नाही. पण त्यांनी काय त्यांच्या घरच्या पैशातून काम केले का, हा तर जनतेचा पैसा आहे, तो जर वाया जात असेल तर लोक प्रश्न विचारणारच, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हा अहंकार दाखवणे बरे नाही, अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मिसिंग लिंकच्या संदर्भात फडणवीस यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटल्याने ते, ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्यावर काय बोलणार , सर्व ज्ञान त्यांच्याकडेच आहे हा फडणवीस यांचा हेका आहे. फडणवीस यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. पण खोटे कोण बोलत आहे, त्यासाठी मी नार्को टेस्टला तयार आहे तुम्ही तयार आहात का, असा सवालही यावेळी उपस्थित केला. नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा फडणवीस यांनीच पसरवली होती. वेगळा विदर्भ, आरक्षण, लाडकी बहिण यांच्याबद्दल खोटे कोण बोलले, समृद्धीत किती कोटींचा भ्रष्टाचार झाला, मिसिंग लिंकमध्ये किती भ्रष्टाचार झाला, मुंबईतील जमीन कोणाला विकल्या हे महाराष्ट्राच्या जनतेला समजू द्या, त्यासाठी नार्को टेस्ट करा, असे आव्हानही यावेळी दिले.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी..

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. सरकारने घोषणा केली पण अद्याप कर्जमाफी केलेली नाही, त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस व मित्रपक्ष आंदोलन करत आहेत. सरकार चर्चेला बोलावते पण चर्चाच करत नाही. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीकाही यावेळी केली.

Exit mobile version