Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात?

राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यभर झंझावाती प्रचार सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यात प्रचार सभा घेऊन आज त्यांनी पुणे व ठाण्यात पदयात्रा व रॅलीमध्ये सहभाग घेतला तसेच प्रचार सभाही घेतल्या. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे असा आरोप अजित पवार करत आहेत तर भाजपा अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर विचारले असता अजित पवार जय जिनेंद्र व जय जैन बोर्डिंग म्हणतात. सरड्यालाही लाजवेल असे रंग हे लोक बदलत आहेत. सत्तेत राहुन एकमेकावर आरोप करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे अन्यथा भाजपाने अजित पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाकारावा. पण ते तसे करणार नाहीत. दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपा शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात नैतिकता राहिलेली नसल्याची टीकाही यावेळी केली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे शहराला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा व वारसा लाभलेला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख होती पण आता पुण्यात ड्रग्जचा काळा धंदा, कोयता गँग, भ्रष्ट व पायाभुत सुविधांचा बोजवारा उडालेले शहर अशी ओळख बनली आहे. आता पुणेकरांनीच आपला पुणेरी बाणा जपला पाहिजे, असे अवाहनही केले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे, त्यांना पक्षात कोणीही चालते. गुंड, मवाली यांना तर त्यांनी पक्षात सामावून घेतलेच आहे आता त्यांनी बलात्काऱ्यांनाही पक्षात सामावून घेतले आहे, अशी टीकाही यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version