विधान परिषदेच्या चार जागेसाठी ८८ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले. मात्र यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज माघार घेतल्याने मुंबईतील ८ जण रिंगणात आहेत. तर कोकणात मनसे पाठोपाठ शिवसेना उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तर नाशिक मधूनही भाजपाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने शिंदे गटाची आणि उबाठा शिवसेना यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
बहुचर्चित मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी अचानक माघार घेतल्यामुळे भाजपा महायुतीचे उमेदवार किरण रवींद्र शेलार विरुद्ध उबाठा गटाचे अनिल परब, असा सामना रंगणार आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा बुधवारी (१२ जून) शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी मुंबई पदवीधरमधून दोन जणांनी माघार घेतली. या मतदारसंघात एकूण ८ जण आखाड्यात असले, तरी मुख्य लढत ही किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघात मनसे पाठोपाठ शिवसेनेच्या संजय मोरे यांनीही माघार घेतली आहे. तर, उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार गटाच्या अमित सरैय्या यांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. मात्र प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारातच होणार असल्याची चर्चा कोकणात सुरु आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनंती केल्यानंतर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याच दरम्यान काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल करणारे दिलीप पाटील आणि भाजपा इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतल्याने आता शिवसेनेचे किशोर दराडे, उबाठा गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे असा तिरंगी सामना रंगणार आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात मात्र मुख्य राजकीय पक्षांतील एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने चौरंगी लढत होणार आहे. भाजपच्या वतीने शिवनाथ दराडे, उबाठा गटाकडून ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची मुभा
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकरिता मतदानाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सुधारित वेळेनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यंदा १ लाख १६ हजार ९२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. पैकी मुबंई शहर ३१ हजार २२९, तर मुबंई उपनगरातील पदवीधर मतदारांची संख्या ८५ हजार ६९४ इतकी आहे.
