Marathi e-Batmya

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहिरः प्रत्येकी ८५ जागा

महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राज्यातील विधानसभा जागांचे गणित मात्र सतत बदलत होते. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते तथा संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीचे तथा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत फॉर्म्युला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या समोरील मोकळ्या मैदानात जाहिर करण्यात आला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार महाविकास विकास आघाडीतील प्रत्येक पक्ष हा ८५ जागा लढविणार आहे. राहिलेल्या उर्वरित जागा या मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

त्यानंतर बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून २७० जागा लढविणार असून उर्वरीत १८ जागा महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांकडून लढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
यानंतर संजय राऊत बोलताना म्हणाले की, उर्वरित जागा मित्र पक्षांना देण्यासंदर्भात मित्र पक्षांबरोबर उद्या सकाळपासून महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यानंतर मित्र पक्षांना देण्यात आलेल्या जागांवर तोडगा काढून त्याबाबतची अधिकृत माहिती जाहिर केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ५ जागांवरील उमेदवार जाहिर करत सहा जागांची मागणी असल्याचे जाहिर केले होते. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा करून पाच जागांची मागणी केली असून यातील काही उमेदवारांची नावेही यावेळी जाहिर केली. या मित्र पक्षांमध्ये डाव्या पक्षांच्या उमेदवारांच्या जागासाठींची मागणी पुढे आली नाही. दरम्यान डाव्या पक्षांचे विद्यमान आमदार तीन ते चार असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्याकडूनही ५ ते १० जागांची मागणी करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version