राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून किती राज्यांमध्ये सत्ता मिळवली याची जाहिरात केली. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वतः पंतप्रधान कसे वागतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी अशाच कठीण परिस्थितीत स्वतःपासून काटकसरीची सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनीही स्वतः उदाहरण घालून दिले होते. त्यांनी देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, भाजप सरकारकडून अशा प्रकारच्या जबाबदार भूमिकेची अपेक्षा कुणालाही वाटत नाही.
भाजप तेरा वर्षे सत्तेत असतानाही देशाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती लपवण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे आणले जात आहेत. तत्कालीन परिस्थितीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणत देशाला स्वयंपूर्ण बनवले. या ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख भाजपनेही करायला हवा. आज देश अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. भारताने यापूर्वी कधीही कोणत्याही देशासमोर शरणागती पत्करलेली नव्हती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची स्वायत्तता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. देशाला अमेरिकेसमोर गहाण ठेवण्याचे काम झाले आहे.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, राहुलजी गांधी यांनी याबाबत अनेकदा भूमिका मांडली आहे. मी स्वतः यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर टीका केली आहे. याचा अर्थ देशाची परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत असुरक्षित होत चालला असून, सामान्य जनतेसमोर अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशावर संकट आलेल्या काळात काँग्रेसने नेहमी सर्वपक्षीय भूमिका घेतली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही परदेश दौऱ्यावर प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आज देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकींना अनुपस्थित राहतात. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचे स्पष्ट होते असेही नाना पटोले म्हणाले.
अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न..
नाना पटोले पुढे म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांची कीव वाटते, त्यांच्या स्वतःच्या मुख्यमंत्र्यांनी हा महिलांशी संबंधित संवेदनशील विषय असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर या प्रकरणातील चार मंत्र्यांबाबतचे पुरावे सादर केले जातील. सरकारने नेमलेल्या एसआयटीची मर्यादा ठरवण्यात आली असून, पीडित महिलांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र, नंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. राज्यात EOW सारखी यंत्रणा असताना ईडीकडे चौकशी सोपवण्याची गरज का भासली? राज्य सरकारचा स्वतःच्या पोलिसांवर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झाला.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. दोषी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बाजूला करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याची भावना जनतेमध्ये आहे. हा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचे आम्ही मानतो.
नाना पटोले म्हणाले की, शिव, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. या विचारांना काळिमा फासण्याचा प्रयत्न कुणीही केला तर तो सहन केला जाणार नाही. या प्रकरणात काळी जादू, अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांशी संबंधित बाबी समोर आल्या आहेत. राज्यात धर्माच्या नावाखाली भोंदूगिरीचा सुळसुळाट वाढत चालला आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय महाराष्ट्राला लागलेली ही कीड थांबणार नाही.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, नाशिकमधील एसएसके हॉटेलमधील घटना आणि खरात प्रकरण यांचा परस्पर संबंध असल्याचा संशय आहे. ही संपूर्ण साखळी असून, सरकारने वेळेत गांभीर्याने कारवाई केली असती तर अनेक महिलांना वाचवता आले असते. त्यामुळे या घटनेला सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे आमचे मत आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये २०१८ साली डेप्युटेशन संदर्भात काढण्यात आलेल्या जीआरचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. एसआरए विभागात महानगरपालिकेचे १८ अधिकारी डेप्युटेशनवर असून, काही अधिकाऱ्यांना नियमित करण्यात आले आहे. यामध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. राज्य आणि मुंबई लुटली जात आहे. या सर्व बाबींबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून, जून महिन्यातील विधानसभेच्या अधिवेशनात हे सर्व मुद्दे सभागृहात मांडणार आहे.
प्रफुल पटेल यांच्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटले की, त्यांनी अजित पवारांसोबत वेगळा पक्ष स्थापन करून दिल्लीतील मोर्चा सांभाळला. प्रफुल पटेल हे माझ्या जिल्ह्यातील नेते आहेत. त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणे किंवा त्यांचा अपमान होणे योग्य नाही. ते आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला स्वतंत्रपणे गेले. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांचा शोध घेण्यातही सरकार अपयशी ठरत आहे. प्रत्येक ५३ मिनिटांनी महिला किंवा मुलींवर अत्याचार होत असल्याची परिस्थिती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढणे ही गंभीर बाब आहे.
शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील अनेक मंत्री आज गुवाहाटीला गेले आहेत. दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगायचे आणि स्वतः मात्र ऐशोआरामात राहायचे, ही भाजपची भूमिका आहे. युद्धकाळात लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःपासून काटकसर सुरू केली होती. त्यावेळी देशातील महिलांनी स्वतःचे दागिने देऊन देशाला मदत केली. मात्र, आजचे सरकार स्वतः ऐशोआरामात राहून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे असेही सांगितले.
