Marathi e-Batmya

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठाच्यावतीने शिवाजी पार्कवर आंदोलन

दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढत तेथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मतचोरीची आणि एसआयआरच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच मुद्यावरून मुंबईतही मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकशाही समर्थक आणि भाजपा विरोधी लोक मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने रविवारी शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला करीत, फेरफटका मारण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांनाही ताब्यात घेतले. या दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनाही पोलिसांनी अडवले. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना भवनाबाहेर जमू लागले असता पोलिसांनी त्यांचीही धरपकड सुरू केली होती. पोलिसांच्या या एकतर्फी कारवाईमुळे संतप्त झालेले आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी अमित, आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह सुमारे २५ जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला.

पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना (उबाठा) आणि मनसेने काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे परिवार सहभागी झाला होता.


दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला असून ‘एक सही संतापाची’ ही राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी स्वतः स्वाक्षरी करून या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला व निषेध व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या संशयास्पद भूमिकेवरून देशभरात विरोधक एकवटले असून येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुंबई आणि दिल्लीत काढण्यात आलेल्या या मोर्चाला जनसमुदायातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तसेच नागरिकांचा सहभागही वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version