Marathi e-Batmya

सागर बंगल्याचा आशीर्वादाने नेते दहशत… रोहित पवार यांचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर अयाज मुल्ला यांच्यावर भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी अयाज मुल्ला यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेत मुल्ला यांची ७६ वर्षीय आईने आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर महिलांना मारहाण करण्यात आली असल्याची घटना घडली.

प्रत्युत्तर म्हणून, NCP (SP) ने आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि पत्नी विद्यमान आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. भाजपाचे संजयकाका पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी मुल्ला आणि पाटील कुटुंबाला पाठिंबा दर्शवित संजय काका पाटील यांचा ट्विटरद्वारे निषेध केला.

यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि संजय काका पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ‘सागर बंगल्या’च्या आशीर्वादाने भाजपाचे नेते राज्यभरात दहशत पसरवत आहेत, असा आरोपही यावेळी केला.

पुढे रोहित पवार यांनी अयाज मुल्लाच्या कुटुंबाला कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी करत अन्यथा या दहशतवादाचा अंत करण्यासाठी आपल्या सर्वांना तिथे यावे लागेल असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हल्ल्यामुळे तासगाव कवठेमहांकाळ या मतदारसंघात दिवंगत आर.आर. पाटील कुटुंब आणि संजयकाका पाटील यांच्यातील वैर आणखी तीव्र झाले आहे. एकेकाळी आरआर पाटील यांच्याशी असलेले वैर आता आरआर पाटील यांचे चिरंजीव विशेषत: २५ वर्षीय रोहित पाटील यांच्याशीही सुरु झाले आहे.

यावेळी रोहित पाटील म्हणाले की, लोकशाहीत अशा प्रकारच्या हिंसाचाराला खपवून घेतले जाणार नाही. गुंडगिरीने कवठेमहांकाळच्या जनतेच्या भावनेला तडा जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशाराही यावेळी देत भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील खासदार असताना सशस्त्र टोळीचे नेतृत्व करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

रोहित पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महिलांवर अत्याचार करून ते कसले पुरुषत्व सिद्ध करू पाहत आहेत? ते असेच वागतात, त्यांचा मुलगा आमदार झाला तर कवठे महांकाळमध्ये कोणाला सुरक्षित कसे वाटेल? अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version