Marathi e-Batmya

भाजपाला विश्वास, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार

काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉ. अतुल भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने – कदम, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे आदी उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण माजी सभापती गितांजली पाटील, माजी नगरसेविका स्वाती तुपे, अनिता यादव तसेच शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लाप्पा बामणे, राजूभय्या मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या अपप्रचाराचा आणि खोटारडेपणाचा काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही कंटाळा आला असून अनेक जण भाजपामध्ये येण्यासाठी उत्सूक आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत. संविधानासमोर नतमस्तक होऊन आपल्या तिस-या कार्यकाळाची सुरुवात करणा-या पंतप्रधान मोदी यांच्या शब्दावर मतदारांचा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि महायुतीला विजयी करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, गेल्या १० वर्षातील मोदी सरकारचे कार्य घरोघरी पोहोचवा आणि पुढच्या पाच वर्षांसाठी घालून दिलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी झोकून देऊन काम करा असेही आवाहनही यावेळी केले.

पुढचा विजय आपलाच असून एक परिवार म्हणून सोबत काम करायचे आहे असेही त्यांनी नमूद केले. याचवेळी कराड दक्षिण मधील सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे, लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या माया मते, नवी मुंबई येथील सुनिता हिवराळे आणि सतविंदर कौर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

Exit mobile version