Marathi e-Batmya

पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार

काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर जनतेकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका करत म्हणाल्या की, सरकार स्वतःच्या चुकांवर उत्तर देत नाही आणि केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे, अशा मंत्र्यांचा राजीनामाच घ्यायला हवा अशी मागणी केली.

पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जोपर्यंत देशातील १४० कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानता नाही तोपर्यंत अशा गोष्टी (पहलगाम हल्ला) होत राहतील. केंद्रीय मंत्री पियूष गोएल म्हणतात की जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला.

पुढे बोलताना रोहिण खडसे म्हणाल्या की, हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती ? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? गेल्या १० वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही ? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे असा संताप करत केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा अशी मागणीही केली.

तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक्सवर पियुष गोयल यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, देशभक्ती के नाम पर किचड मे नहा लो, चुनाव जितने के लिए हिंदू मुस्लिम करा लो अशी खोचक टीका केली.

Exit mobile version