विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तीगत टीका केल्याने ही कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यावर सभागृहात उपस्थित असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यासंदर्भात राज्य सरकारने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा विचार सरकार करेल असे उत्तर दिले.
परंतु भाजपाच्या आमदारांचे समाधान न झाल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. अखेर गोंधळ आवाक्याबाहेर जातोय असे दिसताच सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी सभापती राम शिंदे यांनी स्थगित केले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केले. त्याचे समर्थन मी करत नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तुलना थेट औरंगजेबाशी करणे चुकीचे आहे. औरंगजेब हा क्रुर प्रशासक होता आणि त्याचा कारभार पाहता त्याचे समर्थन करता येत नाही. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
त्यानंतर काँग्रेस आमदार भाई जगताप हे बोलायला उभे रहात म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या पत्रकार परिषदेला हजर होतो. त्यामुळे मी अगदीच स्पष्ट सांगतो की, त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून जसे नेहमीचे प्रश्न येतात, तसेच प्रश्न त्यांनाही तेथे विचारण्यात आले. मात्र काही वेळ आधी औरंगजेबाशी संबधित प्रश्न आला होता. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर तेव्हाचे सरकार आणि आताचे सरकार यात फरक काय असा प्रश्न आला, त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांनी शासन असा उल्लेख करत औरंगजेबाच्या प्रवृत्तीचे शासन असल्याचे वक्तव्य केले होते असा खुलासा केला. त्यावर सत्ताधारी बाकावरील सत्ताधारी कोणत्या तरी सदस्याने प्रदेशाध्यक्षांची बाजू सावरताय का असा सवाल केला. त्यावर भाई जगताप यांनी मला काय मिळणार आहे असे सांगत माझा त्याच्याशी संबध नाही, केवळ मी तिथे होतो असे सांगत वस्तुस्थिती नजरेस आणून दिली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करणे चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्यावर कारवाई करावी पण औरंगजेबाच्या विरोधात एकाबाजूला टोकाचा विरोध करायचा आणि औरंगजेबाच्या कबरीला राज्य सरकारच संरक्षण देत असेल तर कसे चालेल असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे समर्थन कधीच करता येणार नाही असे सांगितले.
त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून त्यांचे वक्तव्य तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी पुढील कामकाज पुकारले आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.
यासंपूर्ण चर्चेत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षच एकटे पडल्याचे दिसून आले. तर भाजपा, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे एका बाजूला झाल्याचे दिसून आले.
