Marathi e-Batmya

पाण्यातील नायट्रेट पातळीत वाढः प्रश्नच समजेना, वाद मात्र गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरेंमध्ये

राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेट-नायट्रोझनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार त्या पाण्याला फिल्टर करणार की नव्याने फिल्टर बसविणार असा सवाल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत यासंदर्भात जी पाच प्रश्न मी उपस्थित केली होती त्यास विभागाने दिलेली उत्तरे विभागाकडून भलतीच देण्यात आलेली आहेत. तरी विभागाने लेखी दिलेली उत्तर तपासून नव्याने उत्तर द्यावीत किंवा तशी दुरूस्ती मंत्र्यांनी आपल्या उत्तरात करावी अशी मागणी केली.

रोहित पवार हे पाण्यातील नायट्रेटच्या पातळीत वाढ झाल्याचा प्रश्न सविस्तर मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्न विचारा विचारा म्हणून धोषा लावला. त्यावर रोहित पवार यांनी प्रश्नच विचारत असल्याचे दोन वेळा स्पष्ट करावे लागले.

त्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहताच म्हणाले की, मला प्रश्न कळाला नाही. प्रश्न बदलून विचारावा अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, मंत्री महोदय आता तुम्ही असे सांगून आणखी वेळ खाऊ नका. हवं तर मी तुम्हाला सांगतो असे सांगत रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सांगितले.

त्यावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हा प्रश्न मुळात फक्त सात जिल्ह्यातील पाणी पुरवठ्या संदर्भात होता. पण त्याची व्याप्ती आता वाढली आहे. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाणाबाबत केंद्र सरकारने केलेल्या परिक्षणानुसार ३५ टक्के आहे. मात्र हेच प्रमाण राज्यातील पाण्यात मात्र १८ टक्के आहे. केंद्र सरकार हे रॅन्डमली परिक्षण करते. मात्र राज्य सरकारडकडून व्यवस्थित परिक्षण केले जाते. त्यामुळे राज्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण कमी आहे. तसेच पाण्यातील नायट्रेटचे प्रमाणा वाढण्यामागे शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेले युरिया आणि नॅनो युरियाचा वापर कारणीभूत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया किंवा नॅनो युरियाचा वापर करण्याऐवजी शेणखत वगैरेचा वापर करण्यास सुरुवात केल्यास नायट्रेटचे प्रमाण कमी होऊ शकेल असा दावा केला.

त्यावर भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी हरकत घेत, शेण वितरणाची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का असा सवाल करत मराठावाडा, विदर्भातील अनेक जिल्यातील पाणी पुरवठ्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. इतकेच काय नांदेड येथील पाण्यात तर सर्वाधिक नायट्रेटचे प्रमाण असल्याचे आढळून आले असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीही या चर्चेत सहभागी होत म्हणाले की, मुळ मुद्दा पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढीचा आहे. असे असताना शेतकऱ्यांना हे खत वापरू नका ते खत वापरू नका असे सांगणे योग्य नाही. एकप्रकारे मंत्री महोदय केंद्र आणि राज्य सरकारमध्येच खताच्या वापराबाबत परस्पर विरोधाभास असल्याचे सांगत आहेत. त्या संदर्भात तुमचा जो निर्णय असेल तो राज्य मंत्रिमंडळात बसून घ्या आणि तसे केंद्र सरकारला कळला, केंद्रातही तुमचेच सरकार आहे असा खोचक सल्लाही यावेळी दिला.

त्यावर पुन्हा गुलाबराव पाटील यांनी उत्तर देण्यास सुरवात केली. परंतु त्या उत्तराने विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावर शिवसेना उबाठाचे आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विनंती करत म्हणाले की, हा प्रश्न स्थगित ठेवावा आणि यासंदर्भात आपल्या दालनात बैठक बोलावून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करत शेवटी राज्यातील पाणी पुरवठ्याचे प्रमाण घातक पातळीवर पोहचण्याआधीच ते रोखणे गरजेचे आहे. तसेच मंत्री महोद्य कोणताही अभ्यास न करता सभागृहात उत्तरे देत असल्याची बाब विधानसभा अध्यक्षांच्या नजरेस आणून दिली. त्यावर संतप्त झालेल्या गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पहात तुझ्या वडिलांना हे माहित होतं त्यामुळेच त्यांनी मला हे खातं दिलं होतं असे सांगितले.

दरम्यानच्या काळात भाजपाचे आमदारा डॉ संजय कुटे आणि अन्य एका सदस्याने पाण्याच्या प्रश्नासाठी आणखी किती वेळ देणार असा सवाल करत यासंदर्भातील उपप्रश्न थांबवावेत आणि दुसऱ्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली.

यावर तातडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या प्रश्नावरील चर्चेत जे काही चुकीचे गेले असेल ते काढून टाकण्यात यावे असे सांगत पुढील प्रश्न पुकारला.

या निमित्ताने पाणी हे जरी सर्वांसाठी आवश्यक आणि गरजेचे असले तरी त्यात कोणत्या घटकाचे प्रमाण किती असावे आणि त्यातील घातक गोष्टींचे प्रमाण कसे कमी करता येईल याबाबतचे माहिती राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांना नसल्याचे आणि त्या बाबतचा प्रश्नही समजलाच नसल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version