Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला तडीपारीची नोटीस दिलीय त्यावर तुम्हाला शिक्कामोर्तब…

‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करताय?शिवसेना नसती आणि शिवसेनेनं तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर तुम्हाला खांदा द्यायलाही चार लोकं आली नसती. आजपर्यंत भाजपाएवढा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आलेला नाही. मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव ‘दि. बा. पाटील’ दिल होतं. त्याचं पुढे काय झालं? अजूनही ते का दिल गेलं नाही? असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

पनवेल येथील स्व.बाळासाहेब ठाकरे विधि महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी भाजपावर टीका केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही स्थानिकांच्या भावना जपतो, त्यांच्या भावनांशी खेळत नाही. आजही जुने शिवसैनिक शिवसेनेसोबत आहेत. ह्याला म्हणतात प्रेम आणि निष्ठा! भाजपा हा पक्ष नाही ती सडकी, कुजकी वृत्ती आहे. देशातून हि वृत्ती आपल्याला तडीपार करावीच लागेल. तर आणि तरच आपल्या देशात ‘अच्छे दिन’ येतील. भाजपानी ‘भगवा’ सोडून सगळे रंग दाखवले आहेत. आम्ही भाजपाला पाठींबा दिला कारण आम्हाला वाटलं, एक बलवान देश जगासमोर दाखवतील. परंतु गुजरात विरुध्द देश अशी भिंत मोदीजी बांधत आहेत असा खोचक आरोपही केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही दहा वर्ष राज्य केल्यावरही जर हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल, तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायक आहात. करदात्याच्या पैशातून सरकारी योजना सुरु आहेत, ह्या भारत सरकारच्या योजना आहेत. मोदी सरकारच्या असूच शकत नाहीत. मी तडीपारीची नोटीस भाजपाला दिली आहे, त्यावर शिक्कामोर्तब तुम्हाला करायचा आहे. महाराष्ट्राची माती आमची आहे, ती आमची आहे. ह्या महाराष्ट्राची माती नांगरुन पुन्हा बीज रोवून अंकूर फोडण्याची धमक आमच्यात आहे असा इशाराही यावेळी दिला.

Exit mobile version