Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचे आव्हान, बंद दाराआडचे धंदे बंद करा…मैदानात या

चार दिवसांपूर्वी राज्यात बाहेरचे बाजारबुणगे महाराष्ट्रात आले होते. बंद दाराआड बोलताना मला आणि शरद पवार यांना संपविण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे आणि हिंमत असेल तर मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करावी असे आव्हान शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिले. जर मला संपवायचे असेल तर या महाराष्ट्रातील जनता मला संपवेल, तुमच्या सारख्या बाजारबुणग्यांनी या गोष्टी करू नये असा इशाराही यावेळी बोलताना दिला.

रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहिर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला अख्खा महाराष्ट्र गिळायचा आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना नको, शरद पवार नको आहे. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जर हा महाराष्ट्र तुम्ही मिळविण्याचा प्रयत्न केला, तर येथील जनता तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी भाजपाला दिला.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचे हिंदूत्व हे नागपूरच्या संघाच्या मोहन भागवतांना मान्य आहे का असा सवाल करत म्हणाले की, आता भाजपाचे हिंदूत्व म्हणजे सत्तेसाठी कोणीही या अशा पद्धतीचे असल्याचे सांगत जर मोहन भागवतांना असले हिंदूत्व मान्य असेल तर त्यांनी जाहिरपणे सांगावे असे आवाहनही केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला संपूर्ण महाराष्ट्र गिळायचा असल्याने दोन वेळा महाराष्ट्रात आलेल्या अमित शाह यांनी मला औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य असल्याचे म्हणाले, तर ते अहमदशाह अब्दाली आहे. चार दिवसांपूर्वी नागपूरात येऊन बंद दाराआड मला आणि शरद पवार यांना संपविण्याची भाषा केली. बाहेरचे बाजारबुणगे येतात महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात अशी खोचक टीकाही अमित शाह यांच्यावर केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, यावेळी मला येथून निसटता विजय नकोय तर दणदणीत विजय हवाय, आपल्या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याचा दणदणीत विजय झाला पाहिजे असे सांगत आघाडीतील शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा असेल नाही तर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याचा दणदणीत विजय मला हवा आहे असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version