पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन आणि इतर मागण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. मात्र शिक्षकांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. तसेच शिक्षकांना चर्चेसाठी सरकारकडून बोलविण्यातही येत नव्हते. त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन किती दिवस चालणार असा सवाल निर्माण झाला होता. मात्र या शिक्षक आंदोलनाच्या मागणीत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेण्यास आणि त्यांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर राज्य सरकारकडून आंदोलन कर्त्या शिक्षकांना चर्चेसाठी पाचारण केले. यासंदर्भात काल प्राथमिक चर्चा झाल्यानंतर शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा निर्णय सरकार दरबारी घेण्यात आला.
आज त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंत्री गिरीश महाजन हे सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचले. त्यावेळी गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याचे सांगत २० टक्के वाढीव वेतन विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वाढीव वेतन जमा केले जाईल. तसेच अधिवेशन संपल्यानंतर त्याबाबतची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत पगाराची तारीख पुढे वाढवली जाणार नसल्याचे आश्वासन दिले.
पुढे बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी संपेल. त्यापूर्वी २० टक्के वाढीव वेतन तुमच्या खात्यात जमा केले जाईल. शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले.
ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यातील पाच हजारांहून अधिक अंशतः अनुदानित खाजगी शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तथापि, हा निर्णय १० महिन्यांनंतरही कागदोपत्री मर्यादित आहे आणि निधीअभावी राज्यातील शिक्षकांनी ८ आणि ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवून आझाद मैदानात तीव्र निषेध सुरू केला. ५ जूनपासून शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
