Marathi e-Batmya

लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वटहुकूम का काढला नाही असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला.

या आव्हानाला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार यांनी माझ्याकडे पुरावे मागण्यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधानांकडे पुरावे मागावेत आणि वटहुकूम सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार काढायला लागलं तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत असा खरमरीत टोलाही लगावला.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. सरकारनेच आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले असा आरोप ठाकरे यांनी केला होता यावर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले की उद्धव ठाकरे यांनी सरकारने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू. अन्यथा तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यावा.

यावर अजित पवार यांच्या आव्हानाला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे उत्तर दिले. पवारांनी माझ्याकडे पुरावे मागण्यापूर्वी पंतप्रधानांकडे पुरावे मागावेत कारण त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आरोप केला होता, असे सांगतानाच लाठीचार्ज करण्याचे आदेश मंत्रालयाकडून दिले गेले नसतील तर त्याचा अर्थ प्रशासनावर त्यांचे नियंत्रण नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आता तुम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वटहुकूम काढा, असे थेट आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी वटहुकूम का काढला नाही, जर असे फडणवीस याना वाटत असेल, तर मी म्हणतो की, माझ्याकडून चूक झाली. आता फडणवीस यांनी विशेष अधिवेशन बोलावून वटहुकूम काढावा असे आव्हानही दिले.

Exit mobile version