निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले.
‘विराट गर्जना मोर्चा’ असे नाव देण्यात आलेला हा मोर्चा दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा येथून सुरू झाला आणि बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे निघाला. या निषेध मोर्चात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीही भाग घेतला.
मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने मुंबईतील शिवाजी पार्कवर ‘जेल भरो आंदोलन’ केल्यानंतर दोन दिवसांनी हा मोर्चा काढण्यात आला.
निषेध सभेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मी २०१७-१८ साली सांगत होतो की यामध्ये चोऱ्या सुरु आहेत. त्यामवेळी मी ममता बॅनर्जी, सोनिया गांधीसह अनेक नेत्यांना भेटून सांगितलं होतं निवडणुकांवर बहिष्कार टाका त्याशिवाय दूध का दूध , पानी का पानी होणार नाही. मी तेव्हा काय सांगत होतो ते सगळ्यांना आत्ता समजायला लागलं. २०२४ विधानसभा निवडणुकीत संपुर्ण बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता हा कोणता विजय? ज्या पक्षाचा निवडणूकीत विजय झाला त्यांच्याकडून साधं विजयोत्सवही साजरा केला गेला नाही. त्यासाठी मतदार यादीत अचानक वाढविण्यात आलेली मतं हे एक कारण होतं. २०२४ लोकसभेनंतर २०२४ विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असे कसे मतदार वाढले? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला २ कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली. त्यानंतर ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३ कोटी १६ लाख १६ हजार मतं मिळाली. मला सत्ताधारी पक्षाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून आम्हाला राग नाही. तुम्ही सत्ता कशी राबवताय याबाबत आम्हाला राग आहे. कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला विरोधात बसवायचं हे या देशातील लोकांनी ठरवायचं, निवडणूक आयोगाने नाही. कोणताही राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत बसतो तेव्हा त्याला सत्ता जाण्याची भिती असते. अशी कोणतीही भिती राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये दिसत नाही, आपण चुकीचा घेतलेला निर्णय, चुकीचं राबवलेलं धोरण हे भविष्यात चुकीचा पायंडा पाडणार का?, याचा विचार देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज सर्व विरोधी पक्ष व्यासपीठावर आहेत. सत्तेतले जे पक्ष आज व्यासपीठावर नाहीत त्यांनीही विचार करायला हवा, जेव्हा उद्या तुम्ही सत्तेतून जाल आणि तुम्ही आज जे करताय ते दामदुपटीने तुम्हाला भोगावं लागेल तेव्हा काय कराल? असा सवाल भाजपाला करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आजपर्यंत जी SIR प्रक्रिया झाली ती संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे. आत्तापर्यंत SIR मधून २ कोटी लोकं बाहेर काढलेत हे २ कोटी लोकं कोण आहेत? जेव्हा दिल्लीत याबाबत चर्चा होईल त्यावेळी SIR रद्द झाला पाहिजे ही मागणी करावी अशी माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आर के सिंह यांचा संदर्भ देत म्हणाले की, महाराष्ट्रात झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द केली जावी, एसआयआर ही प्रक्रिया ही एखाद्या भागापुरती राबविता येते, तसेच आपतकालीन परिस्थिती किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली असल्याच एसआयआर राबविता येते. संपूर्ण देशभरात ही एसआयआर अभियान राबविता येत नाही की, तशी तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात नसल्याचा सांगितले. कायद्यानुसार, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यासच SIR प्रक्रिया राबवली जाते. विधानसभा निवडणुकांदरम्यान ४० ते ६० लाख मतदार नव्याने जोडले गेले आणि त्याद्वारे सत्ता हस्तगत केली गेली. आणि आता, SIR द्वारे दोन कोटी लोकांना वगळले जात आहे. हे दोन कोटी मतदार नेमके कोण आहेत?” असा असवालही यावेळी केला. राज ठाकरे म्हणाले.
