राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी
राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत दिले.
दरम्यान, यावेळी राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सन २०१९-२० साठीच्या मंजूर केलेल्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या एकूण वार्षिक पतपुरवठा आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी ८७ हजार ३२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्द‍िष्टपूर्तीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण उद्द‍िष्टाच्या केवळ ५४ टक्केच साध्य झाल्याची गंभीर बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक नाही. या बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते बॅंकांनी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील शाखांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बॅंकांनी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. उद्द‍िष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी. बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.
शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. बॅंकांचे पीक कर्जाचे उद्द‍िष्ट आणि साध्य यात तफावत असू नये. शेतकऱ्यांप्रती असणारी भावना बॅंकांनी बदलणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतानाच जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती ग्रामीण भागातील बॅंकांच्या शाखांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन योजना, स्टॅण्ड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधील पत पुरवठ्याची कामगिरी देखील सुधारली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कृषीमंत्री पाटील म्हणाले की, क्षेत्रीयस्तरावर होणाऱ्या बैठकांना बँकांनी वरिष्ठ अधिकारी पाठवून, आहे त्याच ठिकाणी अडचणींवर मार्ग काढावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिकस्तरावरच झाला तर त्यांना दिलासा मिळेल. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवितानाच जून-जुलै महिन्यात अतिरीक्त कर्मचारी नेमून पीक कर्ज वेळेवर मिळण्याची व्यवस्था करावी.
बैठकीस राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध राष्ट्रीयकृत बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

रघुराम राजन यांनी भारताच्या सेमीकंडक्टर संस्थेच्या उभारणीवर उपस्थित केला प्रश्न भारत देशांतर्गत उद्योग विकसित करण्यासाठी 'अब्जावधी' रुपये का ओतत आहे

औद्योगिक उपक्रमांवर टीका करणारेही असतात, पण ‘जेव्हा तुम्ही तस्करी करू शकता, तेव्हा बांधकाम का करायचे?’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *