प्रकाश आंबेडकर यांचे मत, भाजपविरोधी आघाडीची गरज; मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा मुसलमानों का सियासी अजेंडा पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन!

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि आरएसएसविरोधात प्रभावी पर्याय उभा करायचा असेल, तर मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाला इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मुंबईत आयोजित नफरत और खौफ़ के दौर में मुसलमानों का सियासी अजेंडा या पुस्तकाच्या प्रकाशना वेळी ते बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेंडकर म्हणाले की, प. बंगाल आणि आसाममधील निवडणुकांमध्ये हिंदू समाजाचा मोठा वर्ग काँग्रेससोबत नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे भाजपविरोधी राजकारणाची नवी दिशा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी तसेच शीख, बौद्ध, जैन यांसारख्या धार्मिक अल्पसंख्यांकांना एकत्र घेऊनच देशात मजबूत भाजपविरोधी राजकीय ताकद उभी राहू शकते, असेही नमूद केले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम समाजाने आता केवळ पारंपरिक राजकीय चौकटीत राहून चालणार नाही. इतर वंचित आणि अल्पसंख्यांक समाजांशी सामाजिक व राजकीय सलोखा निर्माण करून व्यापक आघाडी उभारावी लागेल. यामध्ये समान नागरी कायद्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून, या विषयावर मुस्लिम समाजाने आपल्या समाजातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील, अभ्यासक आणि बुद्धिजीवी यांच्याशी सखोल चर्चा करून स्पष्ट भूमिका ठरवली पाहिजे असेही यावेळी सांगितले.

मुस्लिम राजकारणावर आजही मौलवींचा प्रभाव असल्याची टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मौलवी अनेकदा स्वतंत्र राजकीय भूमिका न घेता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत तर इतर राज्यांमध्ये काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतात. काँग्रेसव्यतिरिक्त इतर धर्मनिरपेक्ष पक्षांकडेही भाजपाविरोधी मतांचा मोठा आधार आहे. त्यामुळे त्या पक्षांसोबतही जाण्याची राजकीय दिशा मुस्लिम समाजाने स्वीकारली पाहिजे, असे स्पष्ट केले.

देशातील सामाजिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अहवालाचाही उल्लेख केला. भारतात मोठ्या प्रमाणावर नरसंहार होऊ शकतो आणि तोही पुढच्या काही महिन्यात घडू शकतो, अशी शक्यता त्या आयोगाने व्यक्त केल्याचे सांगत, अशा धोकादायक परिस्थितीला रोखायचे असेल तर विविध अल्पसंख्यांक, दलित आणि आदिवासी समाजांमध्ये सामाजिक व राजकीय सलोखा निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील लोकशाही, संविधान आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी वंचित आणि अल्पसंख्यांक समाजांनी एकत्र येऊन नवी राजकीय ताकद उभारण्याची वेळ आली असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

यावेळी या प्रकाशन सोहळ्याला रेखाताई ठाकूर (प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), मुज्तबा फारुक (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, जमाअत-ए-इस्लामी, नवी दिल्ली), आरफा खानम शेरवानी (संपादक, द वायर), अब्दुर रेहमान (माजी आयपीएस व लेखक), कॉ. स्मिता गोविंद पानसरे (साम्यवादी नेत्या), सरफराज अहमद (इतिहास अभ्यासक), कलिम अजिम (लेखक व साहित्यिक) आणि नवीन कुमार (संपादक, आर्टिकल १९ इंडिया) या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

About Editor

Check Also

बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश

किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *