कोंबडी शब्दावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळः भुजबळांनी शब्द मागे घेतला अजित पवारांनीही व्यक्ती केली दिलगिरी

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारी मुंबईप्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कोंबडी असा शब्द प्रयोग करताच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले.

दुपारच्या सत्रात मुंबईवरील चर्चेच्या वेळी छगन भुजबळ हे बोलायला उभे राहिले. त्यावेळी त्यांनी बोलण्याच्या ओघात अनेक जण मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून त्या पध्दतीने काम करत असल्याचे वक्तव्य केले. तसेच विचारसरणीत बदल करून मुंबईच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडले.

त्यावर भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी आक्षेप घेत मुंबईचा उल्लेख कोंबडी असा करत मुंबईचा अपमान केला असल्याचा आरोप केला. तसेच भुजबळ यांनी हा शब्द त्वरीत मागे घेण्याची मागणी सभागृहातच केली. मनिषा चौधरी यांच्याबरोबर भाजपाच्या इतर सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेतली.

मनिषा चौधरी यांच्या या चुकीच्या अर्थामुळे भुजबळ संतापले आणि त्या संतापाच्या भरातच त्यांनी आमदार चौधरींना म्हणाले, मी मुंबईचा दोनवेळा महापौर राहिलो आहे. त्यामुळे मला शिकवू नका खाली बस असे म्हणाले. तरीही भाजपाचे सदस्य काही शांत होईना. त्यावर अखेर भुजबळ यांनी पुन्हा एकदा चौधरी यांना उद्देशून आपले ज्ञान आणि क्षमता कळले आता बसा खाली असे सांगितले.

अखेर भाजपाचे सदस्य शांत होत नसल्याने तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे वक्तव्य हे वेगळ्या संदर्भाने आलेले आहे. त्यांच्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपा सदस्यांकडून त्यांचे स्पष्टीकरण मानण्यास नकार दिला. अखेर अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी तो शब्द मागे घेत असल्याचे जाहिर करत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर कामकाज पुन्हा एकदा सुरुळीत झाले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *