लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर आणि खानगाव उपबाजारासाठी जागा छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि समीर भुजबळ यांच्यात चर्चा

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारासाठी सुभाष नगर येथे ०८ हेक्टर ६१.५६ आर तर खानगाव नजिक येथील उपबाजारासाठी ३.५० हेक्टर जमीन बाजार समितीस उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच बाजार समितीला जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच लासलगाव येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती क सत्ता प्रकारात नियमित करण्यास राज्य शासन सकारात्मक असून चालू रेडीरेकनराचा दर भरून नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी व ब सत्ताधारक समितीमध्ये बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल यासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात त्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत दिली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नावर आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने समीर भुजबळ, महसूल विभागाचे सहसचिव, ब सत्ता धारकांच्या वतीने शैलेश ठाकरे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारध्ये,जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,निफाड तहसीलदार,लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे इत्यादी ऑनलाईन द्वारे बैठकीस उपस्थित होते.

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव च्या विंचूर उपबाजाराच्या विस्तारासाठी मौजे सुभाषनगर, ता. निफाड शिवारातील गट नं. १२५/१/अ/१ मधील ०८ हेक्टर ६१.५६ आर जागा व मौजे खानगांव नजिक, ता. निफाड शिवारातील उपबाजार आवारासाठी गट नं. ०२ मधील ३.५० हेक्टर जागा शासकीय दराने खरेदी करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.तसेच   लासलगाव ता. निफाड जि. नाशिक येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती नियमित करणेबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येऊन हा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती. त्यानुसार आज मंत्रालय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. दिवसेंदिवस बाजारपेठेचा विस्तार वाढत असल्याने उपबाजारांसाठी अधिक जमिनीची आवश्यकता होती. यामध्ये विंचूर उपबाजारासाठी सुभाष नगर येथे ०८ हेक्टर ६१.५६ आर जागा तर खानगाव नजीक उपबाजारासाठी खानगाव येथे ३.५० हेक्टर जागा शासकीय दराने खरेदी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. महसूल विभागाच्या ३ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार नाममात्र १ रुपया कब्जेहक्काने रक्कम आकारून दिली जावी .बाजार समितीमध्ये होणारी उलाढाल बघता बाजार समितीचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने या प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी शासनाला आवश्यक ते सहकार्य आमच्याकडून केले जाईल असे यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचा गेल्या अनेक दिवसापासून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शासन या प्रस्तावाबत सकारात्मक असून लवकरच बाजार समितीला जागा दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे सुभाषनगर येथे कांदा निर्यात सुविधा केंद्र तर खानगाव नजिक येथे मिरची हब निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे आता लासलगाव बाजार समितीचा विस्तार अधिक वाढून शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीच्या सुविधा उपलब्ध होण्यासोबतच कांदा निर्यातीसाठी अधिक फायदा होणार आहे.

यावेळी ब  सत्ताधारकांच्या प्रश्नाबाबत माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव ता. निफाड जि.नाशिक येथील सर्व्हे नं.९३ मधील सदरचे प्लॉट रहिवासी प्रयोजनासाठी १९४६ साली स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी लिलावाने वाटप केलेले होते. यातील बऱ्याच मिळकत धारकांनी विनापरवानगी खरेदी विक्री केल्याने शर्थभंग झालेले होते. सबरजिस्टर यांनी त्यावेळी सदरचे दस्त नोंदवून घेतले आहे. यातील काही नोंदी बाकी असल्याने सदर नोंदणी शर्थभंग नियमित करून मिळण्यासाठी नागरिकांची मागणी होती. बिनशेती सारा भरण्यास पात्र मिळकती या ‘क’ सत्ताप्रकारात येतात. लासलगाव येथील मिळकतींना चुकून ‘ब’ सत्ताप्रकार लागलेला होता. त्यामुळे ‘ब’ सत्ताप्रकार मिळकत धारकांच्या ‘ब’ सत्ता मिळकती नियमित करण्याची मागणी आहे. याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी समीर भुजबळ यांनी यावेळी केली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लासलगाव येथील १७३ कुटुंबांचा हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. खरंतर त्याचवेळी रेडीरेकनरच्या दरानुसार कर लावून मार्गी लावणे गरजेचे होते. यामुळे अनेक दिवसांपासून शासनाचा महसूल देखील बुडत आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांच्या समवेत ब सत्ताधारक समितीची बैठक घेऊन रेडीरेकनरच्या दराने सदर ब सत्ताधारकांना क सत्ताधारकामध्ये समाविष्ट करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी आणि ब सत्ताधारक समिती यांच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार समीर भुजबळ यांनी घ्यावी आणि यातून हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, शासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असून लवकरच या ब सत्ताधारक समितीच्या नागरिकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी संपर्क आवश्यक ती मदत आम्ही करू असे यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *