मोदी विरोधासाठी भाजपच्या “वजनदार” नेत्याचे राष्ट्रवादीशी संधान भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे काम सुरु

मुंबईः प्रतिनिधी
केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कंबर कसली आहे. मात्र निवडणूकीतील विजयानंतर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होवू नये यासाठी पक्षातील नाराजांना रसद पुरवून विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न भाजपमधील एका वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान बांधून सुरु केल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून उमेदवारी मिळेल आणि दिल्लीत लोकसभेत बसायला मिळावे अशी इच्छा अनेकांनी व्यक्त करत त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले होते. तर राज्यातील ३ ठिकाणी स्थानिक खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असल्याने सदर मंत्र्याला तिकिट न देण्याची मागणी भाजपच्याच स्थानिक आमदारांकडून करण्यात आली. तरीही आमदारांचा विरोध डावलून विद्यमान खासदारांना उमेदवारी दिल्याने सदर आमदारांनी भाजपमधील त्या वजनदार नेत्याकडे धाव घेत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर त्या वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलून या नाराजांना रसद पुरविण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनीही भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे मान्य केल्याचे सांगत मागील काही दिवसांपासून नाराज असलेले आमदार आणि भाजपकडून बोळवण केलेले उमेदवार पवारांच्या भेटीला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कारभारावर अनेकजण नाराज आहेत. मात्र त्याबाबत जाहीर वाच्यता करता येत नाही. त्यामुळे निवडणूकीच्या निमित्ताने त्याचा वचपा काढण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *