स्टील उद्योग उभारणीसाठी रशिया आठशे कोटींची गुंतवणूक करणार स्टिल कंपनीला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. तसेच या उद्योगाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे सह व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील आणि रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह, आदी प्रतिनीधी उपस्थित होते.
इलेक्ट्रिक स्टिल निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर) शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून ती देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. २०२२ मध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. त्यावेळी सुमारे सहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
औरंगाबादच्या‘ऑरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) हा प्रकल्प होणार आहे. या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून अनेकांना रोजगार मिळणार असल्याने कंपनीला शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
भारतात मागील तीस वर्षांत वीजेची मागणी अंत्यत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज तीस पटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टिल एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला २० टक्के ट्रान्सफॉर्मर स्टिल पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टिल उपलब्ध होणार अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही घट होणार १३ परवानग्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *