आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला असून याअंतर्गत आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती; आता ती केवळ नोंदीपुरती न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार मुरजी पटेल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेच्या अनुषंगाने ॲड. आशिष शेलार यांनी आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसरातील रिक्त जागा, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ परिसर, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8, फोर्स वन, महानंद डेअरी; तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या विविध ठिकाणी मिळून सुमारे ८० एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे यावेळी नमूद केले. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, त्याचे संवर्धन आणि टिकाव यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, याशिवाय पारंपरिक वृक्षारोपण पद्धतीसोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही अवलंब करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगराला अधिक हिरवे, अधिक सुंदर आणि अधिक पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प यामागे असल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

शिवेंद्रराजे भोसले यांचे निर्देश, एअर इंडिया इमारतीची संरचनात्मक तपासणी करा १५ ऑगस्टपासून इमारत वापरात आणण्याचे नियोजन

एअर इंडियाच्या  इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल  संरचनात्मक तपासणी करण्यात यावी.  तसेच आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *