नाना पटोले यांची माहिती; राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा…आमचंही हिंदूत्व पण ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व आम्ही मानतो

कर्नाटक विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारी वाटपाची दुसरी यादी नुकतीच जाहिर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. आता कर्नाटकासोबतच सहा सभा महाराष्ट्रात घेण्यात येणार असून यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. यावर तिथे चर्चा करण्यात येईल. या सभा मोठ्या स्वरूपात कशा करण्यात येतील, याचे नियोजन करून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या सभांना महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील का? आणि सभा कधी पार पडणार आहे? असे विचारले असता नाना पटोले म्हणाले, पहिली सभा या महिन्यात होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात या सभांचे राज्यात आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील सहकारी पक्षांना निमंत्रण देण्यास सांगितलं, तर देण्यात येईल.

ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष सत्याग्रह यात्रेत सावकरांचा फोटो लावणार असल्याचं वृत्त आहे. याबद्दल विचारले असता नाना पटोलेंनी सांगितलं, माध्यमांतील काही गोष्टी चुकीच्या आल्या आहेत. ठाण्याच्या अध्यक्षांना याबाबत विचारले असता, त्यांनी असं काही केलं नसल्याचं म्हटलं. काही माध्यमांनी मूळ मुद्द्याला बाजूला करण्यासाठी भाजपाची सुपारी घेतल्याचं वाटते.

कारण, अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडला आहे. शेतकऱ्यांची काळजी राज्य आणि केंद्र सरकारला नाही आहे. तूर, दाळ, द्राक्ष, कांदा शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू असून आत्महत्या होत आहेत. अशी एखादी कोणती तरी गोष्ट घेऊन, त्याला माध्यमांवर प्रसिद्धी दिली जाते. पण, आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. आमचे हिंदुत्व कुणा येऱ्या गबाळ्याचे नाही. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्या हिंदुत्वाचे समर्थन आम्ही करत आहोत. आम्ही दुसऱ्यांचे समर्थन करत नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीत जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद..

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाशी ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *