कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू विविध योजनांसह ५० कोटींचा निधी मंजूर

ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली.

या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना हक्काचे विमा संरक्षण आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य होणार आहे. याशिवाय वृद्धापकाळात होणारी छळवणूक, जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण आणि निवारा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवरही हे महामंडळ विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१११/महामंडळे, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी या स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता नवी मुंबईतील सी.बी.डी. बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमधील ६ व्या मजल्यावर, रूम नंबर ६१९ मधील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण (मुंबई विभाग) यांच्या कार्यालयात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

या ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या सुचारू कामकाजासाठी शासनाकडून ५० कोटी रुपयांचे भरीव भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. कोकण भवन येथील या कार्यालयाशी ज्येष्ठ नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी ०२२-२७५७५९७९ हा अधिकृत दूरध्वनी क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणींसाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर

एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *