शंभूराज देसाई यांची घोषणा, १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करणार आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील तत्कालीन बलशाली राजवटीच्या तावडतीतून यशस्वी सुटका या ऐतिहासिक घटनेनिमित्त ‘शिवचातुर्य दिन’ आग्रा येथे साजरा करण्यात आला. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘गरुडझेप संस्थेने ‘शिवचातुर्य दिन’’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची,चातुर्याची आणि संयमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे राजशिष्टाचार मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक आग्रा चे समन्वयक जयकुमार रावल यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सुटका करून स्वराज्याकडे परतण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘गरुडझेप मोहीम’ पुणे येथील संस्थेच्या वतीने आग्रा ते राजगड अशी सुमारे १ हजार ३१० किलोमीटरची पायी व सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

आग्रा येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक

आग्रा येथे उत्तरप्रदेश शासन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबत आग्रा येथील विविध तज्ज्ञांशी चर्चा केल्या आहेत. प्रकल्प संकल्पित करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक पार पडली आहे.या स्मारकाच्या कामासाठी जागतिक किर्तीच्या प्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल. हे स्मारक राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि शौर्याचे प्रतीक ठरेल, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशात सर्वत्र पोहोचण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, तसेच गरुडझेप संस्थेमार्फत दरवर्षी शिवचातुर्य मोहिमेचे आयोजनही करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी सांगितले.

गरुडझेप संस्थेमार्फत गेल्या सात वर्षापासून शिवचातुर्य मोहिमेचे आयोजन

गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून ‘आग्रा ते राजगड गडदुर्ग मोहीम’ आयोजित करण्यात येत आहे. ही मोहीम केवळ दुर्गभ्रमंतीपुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. या मोहिमेत सुमारे २,२०० मावळे, तसेच ६० सायकलस्वार सहभागी आहेत., उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून तसेच सुमारे ७८ शहरांमधून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहे. आग्रा येथून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, तिखरी, सेंधवा, धुळे, चांदवड, संगमनेर, भोसरी मार्गे राजगड येथे पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या घटनेचे ऐतिहासिक महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘गरुडझेप मोहीम’ ही केवळ प्रवासाची मोहीम नसून, इतिहास, शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, मोहिमेच्या समारोपावेळी राजगड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर करण्यात येणार आहे.

‘शिवचातुर्य दिना’निमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

‘शिवचातुर्य दिना’निमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक घटना जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष टपाल आवरणाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. या उपक्रमाला विविध संस्था, प्रशासन आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.या मोहिमेच्या निमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक सातवंती किल्ल्याच्या विहिरीतील पवित्र जल विशेष विधीपूर्वक संकलित करून आग्रा किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. गोमंतकातील ऐतिहासिक वारशाचे पवित्र जल शिवरायांच्या चरणी समर्पित करून गोवा व महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याचाही उपक्रम यामाध्यमातून राबविण्यात येत आहे.यावेळी गोव्यातील ५० महिला कलाकार ‘शिवशौर्य’ या ऐतिहासिक नाट्याविष्काराद्वारे शिवकालीन पराक्रम, जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणादायी गाथा सादर करण्यात आली. या कार्यक्रमात गोव्यातील ५० महिला कलाकारांचा ‘शिवशौर्य’ ऐतिहासिक नाट्यप्रयोग, प्रसिद्ध कलाकार सायली जोशी गोडबोले यांचे ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ या विषयावरील एकपात्री नाटक, प्रसिद्ध हलगीवादक विनायक सोनावणे यांचे पारंपरिक हलगी वादन तसेच कराड येथील हिंदू तेज संस्थेकडून शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि शौर्यप्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत. शिवचातुर्य दिन व गरुडझेप मोहीम फ्लॅग ऑफ १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी आग्रा किल्ला परिसर, आग्रा येथे सकाळी ८.०० वा पार पडले.

कार्यक्रमाला विविध मान्यवरांची व शिवप्रेमींची उपस्थिती

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेल्या शिव मंदिराला भेट दिली यावेळी उत्तरप्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, महाराष्ट्राचे रोहयो मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे,महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, उपसचिव विजय पोवार, उत्तरप्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक शक्ती सिंग, प्रातांधिकारी विनोद चौधरी, आग्राचे प्रातांधिकारी कृष्णा चौधरी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता संजय पाटील उपस्थित होते. यावेळी गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती गोळे,नारायणगावचे सरपंच योगेश पाटे,उत्तरप्रदेश अध्यक्ष राकेश विधाते, मध्यप्रदेशच्या अध्यक्ष स्नेहल करमरकर, राजस्थान अध्यक्ष संदीप भोसले, कर्नाटक अध्यक्ष महंत हनुमानदास, गोवाचे अध्यक्ष किरण शिंदे,दिल्लीचे अध्यक्ष राजाराम पाटील, संदीप चौधरी यांच्यासह शिवप्रेमी यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, जातिनिहाय जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, सरकारची ओबीसीविरोधी भूमिका स्पष्ट मनोहर भिडेची राष्ट्रध्वजाबाबत विकृत मानसिकतेतून देश विभाजनाची वक्तव्य वडेट्टीवार यांची सडकून टीका

जातिनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *