उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड प्रफुल पटेल यांचा प्रस्ताव तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे अनुमोदन

तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज वरळी येथील डोम येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस केली, त्यास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अनुमोदन दिले.

पक्षाच्या या बैठकीला राज्यातील आणि देशभरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार, जय पवार हे बैठकीला उपस्थित होते. आवाजी मतदानाने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली.

राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे, अशी प्रफुल पटेल यांची इच्छा होती. पक्षातील जवळपास १५ आमदारांचीही त्यांना पडद्याआडून साथ होती. परंतु पवारांच्या पक्षाच्या पवारच अध्यक्ष हवा, असा ‘महाशक्ती’चा निरोप असल्याने पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. असल्याचे समजते. अखेर पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.

सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, असे पक्षातील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे होते. तर प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, यासाठी काही आमदारांना तयार केले गेले होते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

परंतु पवारांच्या पक्षाचा पवारच अध्यक्ष व्हावा, अशी सूचना दिल्लीतून आल्याने अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून पटेल यांचे नाव आपोपाप मागे पडले. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, त्याचा पक्षाला फायदा होईल तसेच पक्षातील लोकप्रतिनिधी एकसंघ राहतील, असे आमदारांचे म्हणणे होते. पक्षातील सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली. प्रफुल पटेल यांनीच सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले.

पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार नेमके काय म्हणाल्या….

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार म्हणाल्या की, माझ्यासाठी हे केवळ पद नाही तर लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी पूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने काम करेल अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली.

भाषणाच्या सुरुवातीला आणि जेव्हा जेव्हा अजित पवार यांच्या नावाचे उल्लेख करण्याची वेळ आली त्यावेळी सुनेत्रा पवार यांचा कंठ दाठून आल्याचे आणि भावना गहिवरल्याचे चित्र दिसून आले. मात्र त्या जसे जसे पुढे बोलत गेल्या तसतसा त्यांच्या आवाजातील कणखर आणि करारीपणा वाढत गेल्याचे दिसून आले. राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक असल्याने सुनेत्रा पवार यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून आपले भाषण केले.

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आता केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही तर तर संपूर्ण राष्ट्रवादी माझे कुटुंब आहे. अध्यक्षपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच आपण पक्षाशी जोडले गेलेलो होतो असे स्पष्ट करत संपूर्ण भाषणात एकदाही शरद पवार यांचे नाव एकदाही त्यांनी घेतले नाही. मात्र आजी सासू म्हणून शरद पवार यांच्या मातोश्री शारदा पवार यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

सुनेत्रा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार यांच्या निधनाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून येणे शक्य नाही. अजित पवार नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, युवक-महिलांसाठी आणि पक्षासाठी झटत आले. त्यांच्या जाण्याने त्यांची स्वप्ने अर्ध्यावर राहिली पण त्यांची स्वप्ने आता आणखी उंचीवर नेण्याची जबाबदारी आपल्यावर आली असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित पवार आपल्यात नाहीत हा आघात प्रचंड मोठा असला तरी वास्तव मान्य करायला हवे. यातून आपल्या सर्वांना सावरावे लागेल. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर तो विचार आहे. पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला निर्धाने पुढे जावे लागणार आहे. अजित पवार यांची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दाखवलेली वाट, त्यांनी घडवलेला एक सच्चा कार्यकर्ता त्यांची जिद्द आणि शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *