दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. द्राक्ष निर्यातीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासन सकारात्मक असून प्रायोगिक तत्त्वावर आर्थिक मदत देण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषि राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार रोहित पाटील, कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक अंकुश माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ मस्के, तासगाव येथील शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, द्राक्ष शेतकरी तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या योजनेचा लाभ  देण्यासंदर्भात स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार असून, प्रादेशिक गरजेनुसार योग्य वाणांचा समावेश केला जाईल. द्राक्ष निर्यातीमुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, निर्यातक्षम पिकांना शासन सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

शेवटी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये टेबल ग्रेप्स ज्यूस पार्क व तासगाव आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (काढणी पश्चात तंत्रज्ञान) स्थापन करण्याबाबत सकारात्मक तयारी दर्शवत कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा करून कॅलिफोर्निया येथील संशोधन केंद्राशी चर्चा करून नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती. तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा हरभरा खरेदी उद्दिष्टातही ५८६३२ मेट्रिक टनाची वाढ

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *