एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या या मोर्चात ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर पूर्व काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर पश्चिम जिल्हाध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सरचिटणीस आमिर शेख, धनंजय शिंदे यांच्यासह NSUI, युवक काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि शेकडो काँग्रेसजन मोर्चात सहभागी झाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. विश्वजीत कदम म्हणाले की, राज्यातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. परीक्षा प्रक्रियेबाबत वारंवार प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. एमपीएससी MPSC अध्यक्ष व सचिवांनी राजीनामा द्यावा आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे,” अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
Marathi e-Batmya