महाराष्ट्रात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो-महाआयटी करार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंज्यस करार

राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी उपस्थित होते.

या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचविणे, कॅप्टन पडताळणी प्रक्रिया सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

रॉप्पेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपिडो) ही देशातील सर्वात मोठी आणि परवडणारी मोबिलिटी सेवा देणारी कंपनी असून, तिच्या विस्तृत कॅप्टन नेटवर्कचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल उपक्रमांचा प्रसार करण्याचा या कराराचा उद्देश आहे.

या सहकार्याअंतर्गत ‘आपले सरकार’, ‘महा आयडी’, ‘महासारथी’ यांसारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक प्लॅटफॉर्मबाबत जनजागृती व वापर वाढविण्यासाठी रॅपिडोचे तंत्रज्ञान आणि कॅप्टन नेटवर्क उपयोगात आणले जाणार आहे.

महाआयटीचे सुभाष शेळके यांनी सांगितले की, तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि मोठ्या प्रमाणावरील मोबिलिटी नेटवर्कच्या माध्यमातून राज्याच्या डिजिटल प्रशासन आणि नागरिक संपर्क उपक्रमांना बळकटी देता येईल. या करारातील महत्त्वाचा भाग म्हणजे रॅपिडो कॅप्टनसाठी डिजिटल पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणी प्रक्रिया अधिक सक्षम करणे. त्यासाठी ‘महा आयडी’शी एकत्रीकरण करण्याचाही विचार आहे. यामुळे पारदर्शकता, विश्वास आणि प्रवासी सुरक्षितता अधिक मजबूत होईल. तसेच रॅपिडो कॅप्टनना तळागाळातील डिजिटल माहिती दूत म्हणून कार्य करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी सांगितले की, मोबिलिटी प्लॅटफॉर्म केवळ प्रवासापुरते मर्यादित नसून विश्वास, सुरक्षितता आणि नागरिक जनजागृती वाढविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महाआयटीसोबतच्या या सहकार्याद्वारे सार्वजनिक डिजिटल उपक्रमांना चालना देतानाच नागरिकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह मोबिलिटी अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.

या करारानुसार, महाराष्ट्रातील वापरकर्ते आणि कॅप्टन यांच्यापर्यंत शासनमान्य जनजागृती संदेश रॅपिडोच्या ॲपमधील बॅनर, नोटिफिकेशन आणि माहितीपर संदेशांच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक डिजिटल सेवांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

याशिवाय, महाराष्ट्रातील टियर-३ आणि टियर-४ शहरांमध्ये डिजिटल समावेशन आणि कौशल्यविकास उपक्रम राबविण्यासाठी ‘महा-रॅपिडो फेलोशिप प्रोग्राम’ सुरू करण्याचाही विचार दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.

२०१५ मध्ये स्थापन झालेली रॅपिडो कंपनी देशातील ४०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत असून, बाइक टॅक्सी, ऑटो रिक्षा, कॅब, पार्सल डिलिव्हरी, फ्लाइट बुकिंग आणि फूड डिलिव्हरी अशा विविध सेवा पुरवते. कंपनीच्या माध्यमातून देशभरातील ९० लाखांहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

About Editor

Check Also

मंत्रालयासमोर किसान काँग्रेसचे कांदाफेक आंदोलन पोलिसांची आंदोलकांना रोखताना चांगलीच उडाली भंबेरी

राज्यात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी संतप्त झाले असून विविध जिल्ह्यांत आंदोलनांची मालिका सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *