आशिष शेलार यांची माहिती, सोमनाथ मंदिर आस्थेच्या केंद्रासोबतच राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक 'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' उपक्रमास प्रारंभ

सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमास मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून रेल्वेमार्गे प्रारंभ झाला.

यावेळी सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सहभागी नागरिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले, “सोमनाथ मंदिर केवळ आस्थेच्या केंद्रासोबतच राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि भारतीय सभ्यतेच्या अखंड परंपरेचे प्रतीक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सोमनाथ मंदिराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि त्यामागील प्रेरणादायी परंपरा अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.”

या यात्रेत सहभागी नागरिकांना सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन, मंदिराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा तसेच भारतीय परंपरेतील त्याचे महत्त्व यांची माहिती देण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास विधानसभा सदस्य संजय उपाध्ये, नगरसेवक शिवा शेट्टी, आयआरसीटीसीचे अतिरिक्त कार्यकारी प्रबंधक हर्षवर्धनसिंग रावत तसेच रेल्वेचे अतिरिक्त वाणिज्य व्यवस्थापक अमित करवंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले की, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच अभिजात कला, लोककला आणि भारतीय परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या उपक्रमामुळे सोमनाथच्या वैभवशाली इतिहासाचा, अध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय अधिक व्यापकपणे होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *