अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एकूण ८० हजार रुपये वार्षिक अनुदान मिळणार आहे. यामध्ये भोजन भत्त्यासाठी ४२ हजार रुपये, निवास भत्त्यासाठी २८ हजार रुपये आणि निर्वाह भत्त्यासाठी १० हजार रुपये यांचा समावेश आहे.
इतर महसूल विभागीय शहरांमध्ये तसेच उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६८ हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात येईल. यामध्ये भोजन भत्ता ३७ हजार रुपये, निवास भत्ता २१ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता १० हजार रुपये असेल. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून ५ किलोमीटर परिसरातील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण ५७ हजार रुपये वार्षिक अनुदान मिळेल. यामध्ये भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता १७ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता ८ हजार रुपये असेल.
तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ५० हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात येईल. यामध्ये भोजन भत्ता ३० हजार रुपये, निवास भत्ता १३ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता ७ हजार रुपये असेल.
याशिवाय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरिता दरवर्षी ८ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ४ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे.
Marathi e-Batmya