आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपा सरकार घाबरले, आंदोलनाला परवानगी नाकारली टिळक भवनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांना घेतले ताब्यात

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.भाजपा सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना आहे पण भाजपा सरकार संविधानाला पायदळी तुडवत मनमानी काम करत आहे. आझाद मैदानात आंदोलन करु द्या, अन्यथा राज्यपाल यांना भेटू द्या, अशी आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी होती पण भाजपा सरकार व पोलीसांनी आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली. दोन दिवस आदिवासी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत, धमकावत त्यांचा छळ करून शेवटी आज दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

“मागील दोन वर्षात आश्रमशाळेतील ६०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, याची निष्पक्ष चौकशी करावी, आदिवासी विकास मंत्री यांचा राजीनामा घ्यावा, आदिवासी आयुक्त यांची बदली करावी. मुलभूत सुविधा मिळाव्यात, सेंट्रल किचन मधून येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसतो. आमच्या मुलामुलींना पोलीस त्रास देत आहेत. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अन्यथा राज्यपाल यांना भेटू द्यावे, आम्हाला आमच्या समस्या मांडायच्या आहेत”, असे विदयार्थ्यांनी सांगितले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेत नाशिकहून मुंबईत लाँग मार्च काढला. आदिवासी विद्यार्थी ४८ दिवसापासून आंदोलन करत आहेत, मुंबईच्या जवळ त्यांचा लाँग मार्च येताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांची काँग्रेसने त्यांच्या पक्ष कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली असता मध्यारात्रीच पोलिसांनी त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला, बाथरूममध्ये घूसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, धमकावले. काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवन या कार्यालयाला पोलीस छावणीचे रुप दिले होते. टिळक भवनबाहेर शेकडो पोलीस व १०-१२ वाहनांचा मोठा ताफा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी हे दोन दिवस तैनात करण्यात आले होते. फडणवीस यांच्या पोलिसांनी टिळक भवनमध्ये घुसखोरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

टिळक भवनात प्रवेश करून दडपशाही का केली असा जाब काँग्रेस नेत्यांनी विचारला. बेकायदेशीरपणे पक्ष कार्यालयात शिरलात का व कशासाठी, याचे समाधानकारक उत्तर पोलिसांना देता आले नाही. भाजपा सरकार पोलिसांना पुढे करून गुंडगिरी करत आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेसने दिला. काँग्रेस पक्ष आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व यापुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहणार, असे काँग्रेसने स्पष्ट केले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत या लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाईच्या धोरणास मान्यता जवळच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पोलीस कोठडीतील व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या जवळच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *