विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील चार मानकरी
डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड) :
केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. कविता गिट्टे यांनी दिव्यांग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठीही प्रभावी प्रयत्न केले.
कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक) :
नाशिक महानगरपालिका शाळा क्र. १८चा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी विविध अभिनव उपक्रम राबविले. ‘मिशन मोबाईल-फ्री’ अंतर्गत ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’द्वारे संवाद अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना डिजिटल; तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अनुभव मिळवून दिला.
वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) :
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध शालेय व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) :
सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यरत असलेल्या शिवप्रसाद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यासाठी विशेष योगदान दिले. एनडीए तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी लष्करी अधिकारी घडविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या निकषांवर मूल्यमापन करून अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.
विज्ञान भवनात राष्ट्रीय गौरव
शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’वाहिनी तसेच अधिकृत वेबकास्ट आणि सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Marathi e-Batmya