दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा केंद्राकडून गौरव; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या वतीने दि.२४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याच्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. विशेषतः महाराष्ट्राच्या कृषी विभागासाठी हा निश्चितच अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात याबाबत माहिती दिली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मंजूर केलेल्या कामगिरी मूल्यांकन निकषांनुसार मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यांकनात महाराष्ट्राने एकूण कामगिरीच्या आधारे उल्लेखनीय स्थान मिळविले असून, पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे.

याविषयी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत ३१,७४६ प्रकल्प मंजूर झाले असून, त्यापैकी १७,७८६ प्रकल्प महिला उद्योजकांचे आहेत. या प्रकल्पांमधून सुमारे १०.५६ लाख मनुष्यदिन रोजगार, १८ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता आणि ३,१३५ कोटी रुपयांची गुंतवणूक निर्माण झाली आहे. आतापर्यंत ७१५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत उल्लेखनीय कामगिरी करता आली असून राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.”

PMFME राष्ट्रीय पुरस्काराबाबत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची प्रतिक्रिया

याविषयी बोलताना कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, “PMFME योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्राची राष्ट्रीय पुरस्कारासाठी झालेली निवड ही संपूर्ण कृषी विभागासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उत्पादनाबरोबरच काढणीनंतरचे व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया यांना विशेष महत्त्व आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामुळे कृषी उत्पादनाला अधिक मूल्य मिळते, नुकसान कमी होते आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. या पुरस्काराचे श्रेय राज्यातील शेतकरी, महिला उद्योजक, बचत गट, लाभार्थी तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना जाते. यापुढेही अन्न प्रक्रिया क्षेत्राला बळकटी देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे.”

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे, त्यांना सक्षम करणे तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

शेतकरी, महिला बचत गट, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक आणि ग्रामीण भागातील उद्योगांना बळ देण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला जाणार असल्याने हा संपूर्ण राज्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्वाची भूमिका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *