सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपीला जामीन नाकारला अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींकडून हेतुपुरस्सर कृत्य

कुख्यात फरारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या चिथावणीवरून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या हेतूने आरोपींनी हेतुपुरस्सर कृत्य केल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आणि या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) खटला चालविणारे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील आरोपी विकी गुप्ताला जामीन नाकारला होता. त्या आदेशाची सविस्तर प्रत नुकतीच उपलब्ध झाली. फरारी आरोपी अनमोल बिश्नोईच्या सूचनेनुसार अर्जदार विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. जामिनाचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचा प्रथमदर्शनी पुरावा हा आरोपीचा कबुली जबाब असतो. गुप्ताच्या जबाबानुसार, तो पालच्या संपर्कात होता आणि नंतर तो कुख्यात टोळीत सामील झाला. त्याबाबतचा सर्व तपशील त्याने जबाबात सांगितला असून गोळीबार करण्याची योजना कशी आखली, या संपूर्ण घटनेचेही कथन गुप्ताने केल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींचे कबुली जबाब आणि पुरावे यावरून स्पष्ट होते की, अर्जदार आणि अन्य आरोपींनी हेतुपुरस्सर किंवा माहिती घेऊन सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता, असे निरीक्षण न्यायालयाने गुप्ताला जामीन नाकारताना नोंदवले.

दाखल केलेल्या तक्रारीवरूनही स्पष्ट होते की, दोन व्यक्ती मोटरसायकलवर आल्या आणि दुचाकीस्वाराने खानचे निवासस्थानावर गोळ्या झाडल्या. पीडित (सलमान खान) च्या जबाबानुसार, तो एक सेलिब्रिटी असून असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी तो घराच्या गॅलरीत येत असतो. अनेकदा पहाटेच्या वेळी तो तसे करीत असे. सलमानचा जबाब आणि दाखल तक्रारीनुसार, आरोपींनी सलमान गॅलरीत येत असलेल्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या. दुसरीकडे, अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, या एका कारणावरुन मकोका कायद्यान्वये शिक्षेपासून सुटका करता येणार नाही. अर्जदाराच्या कबुली जबाबासह पुराव्यावरून अर्जदार गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट होते. तसेच गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता, सराईत गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याने अशाच प्रकरणाच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही न्यायालयाने गुप्ताचा जामीन फेटाळताना निरीक्षण नोंदवले.

About Editor

Check Also

पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा आवाज अखेर कायमचा शांत ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *