आता घरीच जाणून घ्या आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले.

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

चाचणी कोणी करावी

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

अशी करावी चाचणी

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.

सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.

चाचणीचा निष्कर्ष

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती, त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट उपकंपनी स्थापन करणार

राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *